मला खासदार केले असते तर, आज शिवसेनेत भूकंप झाला नसता : छत्रपती संभाजीराजे | पुढारी

मला खासदार केले असते तर, आज शिवसेनेत भूकंप झाला नसता : छत्रपती संभाजीराजे

वाळकी: कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी करण्यापेक्षा महाआघाडीपुरस्कृत म्हणून राज्यसभेचा खासदार करा अशी अपेक्षा मी महाविकास आघाडीकडे व्यक्त केली होती. मात्र छत्रपतींच्या नावावर राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पुढाऱ्यांना छत्रपतींच्या विचारांची व घराण्याची कदर नसल्याचे दिसून आले. मला राज्यसभेचा खासदार केले असते तर, आज महाराष्ट्रात जो राजकीय भूकंप झाला आहे तो झालाच नसता आणि तशी परिस्थिती ओढावली नसती . पण एक मात्र बरं झाल मी खासदार झालो नाही. आता राज्यभरात स्वराज्य संघटनेसाठी फिरायला मोकळा झालो असे प्रतिपादन छत्रपतींचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे लोकवर्गणीतून साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कामाचा शुभारंभ व भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की आजपर्यंत समाजातील कोणत्याही व्यक्तीवर कुठलेही संकट आले तरी छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज ,महाराणी ताराबाई यांची शिकवणीतून आम्ही संकटप्रसंगी धावून गेलो आहोत. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून विस्थांपितांसाठी काम करण्याबरोबरच अन्याय , अत्याचाराविरोधात लढा उभारणार आहोत . मराठा , बहुजण समाजाच्या आरक्षणासाठी आम्हीच लढा सुरु केला .आज समाजाला छत्रपतींच्या विचाराची गरज आहे . छत्रपतींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे . तरूण पिढीने छत्रपतींच्या घोषणा देण्यापेक्षा त्यांच्या विचारांची अंबलबजावणी करणे गरजेचे आहे.

भविष्यामध्ये स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून प्रस्थापितांना राजकारण्यांना उत्तर देणार आहे, महीला, पुरुष,विद्यार्थी,विद्यार्थिनी, शेतकरी यांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत आवाज उठवणार आहोत .आज जेवढी ताकद पुरुषांची आहे तेवढीच महिलांची आहे . हेच महाराणी ताराबाई यांनी शिकवले आहे. पण ग्रामीण भागातील महिलांना याची जाणीवच नाही .या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, मा . सभापती अभिलाष घिगे , मा . उपसभापती संतोष म्हस्के , सरपंच मंगल सकट , उपसरपंच संतोष भापकर , सोनु भुजबळ आदींसह ग्रामस्थ नगर,पुणे,मुंबई, कोल्हापूर येथून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button