वाळवा तालुक्यात खरिपाची 8.5 टक्के पेरणी | पुढारी

वाळवा तालुक्यात खरिपाची 8.5 टक्के पेरणी

इस्लामपूर पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील टोकणी-पेरणी खोळंबली आहे. कडक उन्हाने पिके होरपळू लागली आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपाच्या 23 हजार 122 हेक्टर पैकी 1 हजार 976 हेक्टरमध्ये खरीप पिकांची टोकणी-पेरणी झाली आहे. फक्‍त साडेआठ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.

जूनचा पंधरवडा उलटला तरी पावसाला अजून सुरुवात झालेली नाही. शेत तयार करून शेतकरी टोकणी-पेरणीसाठी सज्ज झाला आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी भाताचे – 1 हजार 438 हेक्टर , खरीप ज्वारी- 256 हेक्टर , मका – 610 हेक्टर, सोयाबीन- 13 हजार 175 हेक्टर , भुईमूग- 7 हजार 416 हेक्टर, तूर, मूग, उडीद – 227 हेक्टर असे एकूण 23 हजार 122 हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये आता सोयाबीन 870 हेक्टर, भात 480 हेक्टर, भुईमूग 476, इतर पिके 150 हेक्टर या पिकांची एकूण 1 हजार 976 हेक्टर क्षेत्रावर टोकणी-पेरणी झाली आहे.

शेतकर्‍यांनी शेतात पुरेशी ओल म्हणजेच सलग 2-3 दिवसांत किमान 70 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. सोयाबीनच्या बियाणांची उगवण क्षमता तपासल्याशिवाय व बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी-टोकणी करू नये, असे आवाहन वाळवा तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी केले आहे.

पावसाने उघडीप दिल्याने उगवण झालेली पिके वाळू लागली आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाण्याचे नियोजन करताना शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे. तालुक्यात आडसाली ऊस लागणीचा धडाका सुरू आहे. तसेच शेतीमशागतीच्या कामांना गती आहे.

खरिपाचे क्षेत्र 23 हजार हेक्टर : पावसाअभावी पेरणी खोळंबली

 

हेही वाचा

Back to top button