पाऊस लांबला तरी पाणीकपात नाही; महापालिका प्रशासनाची भूमिका | पुढारी

पाऊस लांबला तरी पाणीकपात नाही; महापालिका प्रशासनाची भूमिका

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जून महिना आता जवळपास संपत आला असला तरी अद्याप पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये फक्त साडेतीन टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. असे असले तरी तूर्तास तरी पाणी कपातीचा विचार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस सुरू झालेला नाही. त्याचबरोबर धरणांच्या क्षेत्रातही मान्सूनपूर्व पाऊस यंदा झालेला नाही, त्यामुळे आता जून महिना संपत आला असतानाच धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. दि.19 जूनअखेर खडकवासला धरणसाखळीत अवघा 3.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

सातारा : पुनर्रचनेमुळे बदलली राजकीय समीकरणे

गतवर्षी दुप्पट म्हणजेच जवळपास 7.06 टीएमसी इतके पाणी होते. जून महिना संपत आला तरी पावसाला सुरुवात झाली नसल्याने शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने तूर्तास तरी पाणी कपातीचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.महापालिकेकडून धरणांमधून शहरासाठी सद्य:स्थितीत दिवसाला 1,600 एमएलडी पाणी उचलले जाते.

महिन्याला साधारणपणे सव्वा ते दीड टीएमसी इतके पाणी लागते. त्यामुळे उपलब्ध पाणी पुढील अडीच महिने पुरू शकणार आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या कसल्याही प्रकारच्या सूचना अद्याप जलसंपदा विभागाने महापालिकेला केलेल्या नाहीत आणि यासंदर्भात कोणताही निर्णय घेणार नसल्याचे महापालिकेनेही स्पष्ट केले.

धरणांतील पाण्याची सद्य:स्थिती (टीएमसी)

धरण                पाणीसाठा
खडकवासला        0.31
पानशेत               1.54
वरसगाव              1.58
टेमघर                 0. 00

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी मुठा उजव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी सोमवारपासून बंद होणार आहे. धरणांमध्ये सद्य:स्थितीत साडेतीन टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक असून त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचा विचार नाही. 15 जुलैनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे मनपा.

हेही वाचा

सुशोभिकरणाचे काम युध्दपातळीवर करणार

‘श्रीमंत’ कंपनीकडे अडकले गुंतवणूकदारांचे लाखो रुपये

प्रत्येक गावांत पिण्याचे शुद्ध पाणी देणार : बाबर

 

Back to top button