वर्धा : दुचाकी अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : शाळेच्या कामानिमित्त दुचाकीवरून आर्वीला गेलेल्या दोन शिक्षकांचा वर्ध्याला परतताना अपघातात मृत्यू झाला. विवेक नागोराव शापेकर (वय ४३) व नारायण सदाशिव दोडके (वय ४३) रा. वर्धा अशी त्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. घटनेची नोंद आर्वी पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण दोडके हे चांदणी जिल्हा परिषद शाळेत तर विवेक शापेकर हे टेंभरी (परसोडी) जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. शनिवारी दोघेही शाळेच्या कामानिमित्त (एचएच ३२ एक्स ६४९७) दुचाकीने आर्वीला गेले होते. रात्री ८ च्या सुमारास वर्ध्याला परतत असताना वाढोणा ते बेढोणा दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
यामध्ये विवेक शापेकर याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या नारायण याला आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आर्वी पंचायत समितीचे सभापती हनुमंत चरडे यांच्यासह उपस्थितांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यास सहकार्य केले.