अग्निपथ योजना : तरुणांनी भविष्य डोळ्यासमोर ठेवून भरतीची तयारी सुरू करावी; राजनाथ सिंह यांचे आवाहन | पुढारी

अग्निपथ योजना : तरुणांनी भविष्य डोळ्यासमोर ठेवून भरतीची तयारी सुरू करावी; राजनाथ सिंह यांचे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अशातच वयोमर्यादेत वाढ केल्याने तरुणांनी आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून लष्कर भरतीकडे लक्ष देण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटवरून केले केले आहे. तरुणांच्या भविष्याची चिंता करीत त्यांच्याप्रती संवेदनशीलता दाखवल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही ट्विटरवरून आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्याने भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. पंरतु, गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत, सरकारने २०२२ साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २०२२ अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे करण्यात आली असल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, अवघ्या काही दिवसांमध्ये लष्करभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पंतप्रधानांच्या निर्देशांनूसार केंद्र सरकारने यंदा लष्करभरतीची वयोमर्यादा २१ वरून २३ पर्यंत वाढवल्याने अनेक तरुण ‘अग्निवीर’ बनण्यास पात्र ठरतील.अग्निपथ योजना तरुणांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी जोडण्याची तसेच देशसेवा करण्याची सुर्वणसंधी देईल. गेल्या दोन वर्षात लष्करभरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. परंतु या योजनेमुळे अनेक युवकांना यंदा लष्करात भरती होण्याची संधी मिळेल, असेही सिंह म्हणाले.

यावर्षी योजनेतील वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल असे स्पष्ट करीत, अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एका निवेदनातून केले आहे. वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे आमच्या अनेक उत्साही आणि देशभक्त तरुणांना संधी मिळेल, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

 

Back to top button