Agnipath scheme : पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे ते समजत नाही; राहुल गांधींचा टोला | पुढारी

Agnipath scheme : पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे ते समजत नाही; राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील जनतेला काय हवे आहे ते पंतप्रधानांना समजत नाही. याचा पंतप्रधानांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना त्यांच्या मित्रांच्या आवाजाशिवाय इतर कोणाचा आवाज ऐकूच येत नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर या योजनेवरून पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ या नव्या योजनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अग्निपथ – तरुणांनी नाकारले, कृषी कायदा – शेतकऱ्यांनी नाकारला, नोटाबंदी – अर्थतज्ज्ञांनी नाकारली, जीएसटी – व्यापाऱ्यांनी नाकारली”, त्यामुळे देशातील जनतेला काय पाहिजे हे पंतप्रधानांना समजत नाही. त्यांना त्यांच्या ‘मित्रांच्या’ आवाजाशिवाय काहीही ऐकू येत नाही.

काँग्रेस नेते राहुल यांनी आपल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये लिहिले की, “नो रँक, नो पेन्शन, 2 वर्षांसाठी थेट भरती नाही, 4 वर्षांनंतर स्थिर भविष्य नाही. लष्करासाठी सरकारचा आदर नाही, देशातील बेरोजगार तरुणांचा आवाज ऐका, त्यांना ‘अग्निपथ’वर चालवून त्यांच्या संयमाची ‘अग्निपरिक्षा’ घेऊ नका, असा सल्लाही राहुल गांधींनी पंतप्रधानांना दिला आहे.

प्रियांका गांधींचाही सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीनीही अग्निपथ योजनेबाबत सरकारवर हल्लाबोल करत, ही योजना तातडीने मागे घेण्याची मागणी सरकारला केली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वधेरा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजप सरकारला नव्या सैन्य भरतीचे नियम बदलून २४ तासही उलटले नाहीत. म्हणजेच घाईघाईने तरुणांवर ही योजना लादली जात आहे. ”नरेंद्र मोदीजी, ही योजना तात्काळ मागे घ्या, हवाई दलातील रखडलेल्या भरतीत नियुक्त्या करा. वयात सवलत देऊन लष्कर भरती पूर्वीप्रमाणेच करा.

Back to top button