हिंगोली : चुलत भाऊ- बहिणीची शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

हिंगोली : चुलत भाऊ- बहिणीची शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या

डोंगरकडा; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे चुलत भाऊ बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन्ही मृतदेहावर डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी सकाळी उत्तरीय तपासणी केली. ऐश्वर्या पंडित ( वय १८) व आनंदा पंडित (वय २८) अशी मृत भाऊ -बहिणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे ऐश्वर्या पंडित व त्यांचा चुलत भाऊ आनंदा पंडित हे एकाच गल्लीमध्ये राहतात. सोमवारी सायंकाळी सहा वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून ऐश्वर्या हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, राजेश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, आज पहाटे आनंदा पंडित यांनी डोंगरकडा शिवारामध्ये एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी डोंगरकडा शहरात जाऊन आनंदा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथे आणला आहे. मृत आनंदा पंडित व ऐश्वर्या पंडित हे दोघेजण चुलत भाऊ बहीण आहेत. दरम्यान या दोघांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button