पुणे : पर्यटकांच्या अस्ताव्यस्त पार्कींगमुळे प्रचंड वाहतूक कोंडी, पालिकेचे पार्कींग फुल्ल; वाहनचालकांच्या नाकी नऊ | पुढारी

पुणे : पर्यटकांच्या अस्ताव्यस्त पार्कींगमुळे प्रचंड वाहतूक कोंडी, पालिकेचे पार्कींग फुल्ल; वाहनचालकांच्या नाकी नऊ

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  सुट्टीचा शेवटच्या रविवारी प्राणिसंग्रहालयात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांंच्या वाहनांमुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय ते बालाजीनगर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातून वाट काढताना येथून जाणार्‍या वाहनचालकांच्या नाकी नऊ आले. येथून वाट काढताना वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तास वेळ लागला.

प्राणिसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांना आपली वाहने पार्कींग करण्यासाठी महापालिकेकडून येथे भव्य पार्कींग उभारण्यात आले आहे. मात्र, रविवारी येथे येणार्‍या पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्यामुळे येथील पार्कींग फुल्ल झाले होते. त्यामुळे पर्यटकांना आपल्या चारचाकी, दुचाकी लावण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे अनेल पर्यटकांनी सुरूवातीला येथेच पादचारी मार्गावर आपली वाहने पार्क केली. त्यानंतर सुध्दा जागा न मिळाल्याने पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यातच पार्क करण्यास सुरूवात केली. याचा परिणाम येथील वाहतूकीवर रविवारी दिवसभर पडल्याचे पहायला मिळाले. येथे प्रचंड वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतूक नियोजनासाठी पोलिस नव्हते…
राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे रविवारी पर्यटकांच्या गर्दीचे प्रमाण वाढते असते. त्यामुळे येथे नियमित वाहतूक पोलिस वाहतूक नियमनासाठी असणे आवश्यक आहे. परंतु, रविवारी दुपारी 12.30 वाजेपासून 4.00 वाजेपर्यंत याठिकाणी एकही वाहतूक पोलिस नियोजनासाठी नव्हते. यामुळे येथे यावेळेत आणखीनच वाहतूक कोंडी झाली होती.

Back to top button