परभणी : तीनशे किमी सायकलिंग करून ‘बीआरएम’ शताब्दी वर्ष साजरा | पुढारी

परभणी : तीनशे किमी सायकलिंग करून 'बीआरएम' शताब्दी वर्ष साजरा

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर शहरातील जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने फ्रान्स देशात सुरू झालेल्या ३०० किमी बीआरएम लांब पल्ल्याच्या सायकलिंगला शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे शनिवारी ३०० किमी सायकलिंगचे आयोजन करून बीआरएम शताब्दी वर्ष साजरा करण्यात आला. यात ५ सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला होता.

फ्रान्‍समध्‍ये १९२२ साली ३०० किमी बीआरएम लांब पल्ल्याच्या सायकलिंगला सुरुवात झाली होती. ११ जून २०२२ रोजी सदरील लांब पल्ल्याच्या सायकलिंगला शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने ३०० किमी बीआरएमच्या शताब्दी वर्षानिमित्त संबंध जगभरात ११ व १२ जून रोजी ३०० किमी शताब्दी राईडचे आयोजन केले होते.

जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने हे ‘बीआरएम’च्या शताब्दी वर्षानिमित्त जिंतूर-औरंगाबाद-जिंतूर दरम्यान शनिवारी (दि. ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ३०० किमी लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे आयोजन केले होते. याप्रसंगी देवेंद्र अण्णा भुरे आणि व्यंकटेश भुरे यांनी सायकलस्वारांना झेंडी दाखवली. या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी सायकल स्वारांना २० तासांचा निर्धारित वेळ देण्यात आला होता. सहभागी सायकल स्वारांनी निर्धारित वेळेच्या आत ३०० किमीचा पल्ला गाठून शताब्दी वर्ष साजरा केला.

या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी हिंगोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, येलदरी येथील प्रमोद भालेराव, सेनगाव येथील गजानन देशमुख, सेलू येथील सुरेश नखाते व जिंतूर येथील यासीन खान आदी ५ सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी सहभागी सायकल स्वारांचा क्लबचे सीआर व्यंकटेश भुरे, देवेंद्र भुरे, पवन कालापाड, शेख शाहरुख, नायब तहसीलदार अनंत शहाणे, ज्ञानेश्वर रोकडे, नजीर पठाण, अजित गोरे, यज्ञेश मापारी आदींनी पुष्पहाराने गौरव केला.

उमाकांत पारधी यांनी सव्वा तेरा तासात कापले ३०० किमीचे अंतर

शहरातील जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने ३०० किमी बीआरएम शताब्दी वर्षानिमित्त ३०० किमी लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्याचे पर्यावरण प्रेमी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी पाऊस, वादळी वाऱ्याला न जुमानता प्रतिकूल परिस्थितीत केवळ सव्वा तेरा तासात तब्बल ३०० किमीचे लांब अंतर सहजतेने कापले.

हेही वाचलंत का?

Back to top button