ज्येष्ठ नागरिकाला दहा लाखांना गंडा, अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक | पुढारी

ज्येष्ठ नागरिकाला दहा लाखांना गंडा, अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  पुण्यातील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 9 लाख 79 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. महावितरणचा अधिकारी असल्याने सांगून वीजबिल भरण्यासाठी क्युएस अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे सायबर चोरट्याने ही फसवणूक केली आहे.

या प्रकरणी कोरेगाव पार्क येथील मीरानगर पार्क सोसायटीत राहणार्‍या एका 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध आयटी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 जून रोजी सायंकाळी सात ते 9 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडला.

बीआरटी रस्त्यावरील चेंबरवर बसवले झाकण

फिर्यादी यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्याने प्रथम वीजबिल भरण्याबाबत मेसेज पाठविला. त्यानंतर त्यांना फोन करून आपण महावितरणचा अधिकारी आयुश कुमार असल्याचे सांगितले. त्यांना वीजबिल भरण्यासाठी क्युएस नावाचे अ‍ॅप पाठवून ते डाऊनलोड व इन्स्टॉल करायला सांगितले. त्याबरोबर त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस सायबर चोरट्याकडे गेला. त्यानंतर त्याने या ज्येष्ठ नागरिकाच्या चालू खात्यातून 4 लाख 89 हजार 531 रुपये आणि 4 लाख 89 हजार 531 रुपये असे 9 लाख 79 हजार 62 रुपये ट्रान्सफर करून घेऊन फसवणूक केली.

वैयक्तिक क्रमांकावरील एसएमएसना प्रतिसाद नको!
वीज ग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधायला सांगणे, त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व या प्रकारे वीज ग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट एसएमएसना कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Back to top button