नाशिक : उंचावरुन खाली फेकलेल्या श्वानावर मंगलरुप गोशाळेच्या मदतीने शस्त्रक्रिया | पुढारी

नाशिक : उंचावरुन खाली फेकलेल्या श्वानावर मंगलरुप गोशाळेच्या मदतीने शस्त्रक्रिया

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

टवाळखोर तरुणांनी एका निष्पाप श्वानाला तब्बल ३० फूट उंचावरून खाली फेकल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चार दिवसांपूर्वी नाशिकमधील सिडको परिसरात घडली खरी; परंतु, या घटनेत श्वानाच्या मोडलेल्या पायावर डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी शस्त्रक्रिया करून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा संदेश मंगलरुप गोशाळेच्या सदस्यांनी दिला आहे.

त्रिमूर्ती चौक येथे दिव्या ऍडलॅब या सिनेमागृहाच्या प्रवेशद्वारावर काही टावळखोरांनी एका श्वानाला तब्बल 30 फुटावरून खाली फेकले. या घटनेत श्वानाचा मागील पाय मोडला. पाय मोडल्याने बराच वेळ विव्हळणाऱ्या या श्वानाला पाहून काही जागरूक नागरिकांनी मंगलरूप गोशाळेच्या टिमशी संपर्क साधला. काही क्षणातच ही टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या श्वानाला ताब्यात घेत त्याच्यावर प्रथमोपचार सुरू केले. त्यानंतर पशुवैद्यांच्या सहकार्याने त्यावर यशस्वी शस्रक्रिया केली. मोडलेल्या पायाला स्टीलप्लेट लावून मोडलेले हाड जुळविले. साधारण एक ते दीड महिना त्या श्वानाच्या पायात ती स्टीलप्लेट राहील आणि पाय व्यवस्थित जुळल्यानंतर प्लेट काढली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. श्वानाची शस्रक्रिया करण्यासाठी डॉ. सचिन वेंदे, डॉ. संदीप पवार आणि डॉ. अनंत साखरे तसेच त्यांच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहकाऱ्यांनी व मंगलरूप गोशाळेच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

हे सर्व काम करत असताना त्या मुक्या जनावराने कुठलाही त्रास दिला नाही, याचे आम्हाला खूप कौतुक वाटते. या भूतलावर त्रास देणारा फक्त बोलका मनुष्य जातीचा प्राणी आहे, हे या सर्व घडलेल्या प्रकरणातून जाणवले.

– पुरुषोत्तम दगु आव्हाड, मंगलरूप गोशाळा, नाशिक

हेही वाचा :

Back to top button