Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र : दिल्‍ली पोलिसांनी केली लॉरेन्स बिष्णोईची चौकशी | पुढारी

Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र : दिल्‍ली पोलिसांनी केली लॉरेन्स बिष्णोईची चौकशी

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

चित्रपट अभिनेता सलमान खान याला धमकीचे पत्र पाठविल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सोमवारी तिहार तुरुंगात कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांची प्रसिध्द गायक सिध्दू मुसेवाला याच्याप्रमाणे हत्या घडवून आणली जाईल, अशा आशयाचे पत्र रविवारी सलमानच्या घराजवळ सापडले होते.दरम्यान, मुंबईतही सलमानच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Lawrence Bishnoi : बिष्णोईने रचला होता सलमानच्‍या हत्‍येचा कट

मागील वर्षी लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानला हत्येची धमकी दिली होती. या कामासाठी लॉरेन्सने आपला खास साथीदार संपत नेहरा याला मुंबईला पाठविले होते. नेहराने मुंबईत येउन सलमानच्या घराची रेकी केली होती. सलमानला मारण्यासाठी संपतने आपल्या गावातील एका इसमाकडून आरके स्प्रिंग प्रकारची रायफल खरेदी केली होती. मात्र नेमका त्याचवेळी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. काळ्या हरणाची शिकार केल्याच्या प्रकरणात सलमान खान हा मुख्य आरोपी होता. बिष्णोई समाजात हरणाला पवित्र समजले जाते. त्यामुळे बिष्णोई सलमानवर चिडला होता आणि यातूनच त्याने सलमानच्या हत्येचा कट रचला होता.

‘रेडी’ नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमानवर गोळी झाडण्याची योजना होती; पण हा कट यशस्वी झाला नाही. आता सलमानला नव्याने धमकीचे पत्र मिळाल्याने यामागे लॉरेन्सच आहे काय, याचा कसून तपास दिल्ली पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button