पिंपरी-निगडी मेट्रोचे काम केंद्रामुळे रखडले; अजित पवार यांचा आरोप | पुढारी

पिंपरी-निगडी मेट्रोचे काम केंद्रामुळे रखडले; अजित पवार यांचा आरोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या मार्गास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, केंद्राकडून मंजुरी मिळत नसल्याने ते काम रखडले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.

शहरात पिंपरी ते फुगेवाडी या 5.80 किलोमीटर मार्गावर 6 मार्चला मेट्रो सुरू झाली. मात्र, निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतच्या 4.41 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही, या प्रश्नावर ते बोलत होते. पवार म्हणाले की, पिंपरी ते निगडीपर्यंत विस्तारीत मार्गाचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य व केंद्र सरकार उचलणार आहे. राज्य शासनाने त्या खर्चास प्राधान्याने मंजुरी दिली. त्यांचा खर्च राज्य शासन उचलणार आहे. मात्र, केंद्राने आपल्या हिश्शाच्या 10 टक्के खर्चास अद्याप मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे काम सुरू झालेले नाही.

अर्धवट मार्गावर मेट्रो सुरू करण्याची घाई झाली का? या प्रश्नावर ते म्हणाले की, केंद्राने निर्णय घेतला. त्यांना वाटले त्यांनी मेट्रो सुरू केली. कासारवाडीतील मेट्रो स्टेशनला भोसरी असे चुकीचे नाव दिले आहे. ते बदलून नाशिक फाटा करण्याबाबत माझ्याकडे निवेदने आली आहेत. त्याबाबत महामेट्रोला सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटनांत वाढ

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग जाणीवपूर्वक पिंपरी-चिंचवड शहराला वगळल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी मंत्री नसताना त्या मार्गाच्या डिपीआर, निविदा व खर्चाला मंजूरी मिळाली होती. ते काम सुरू झालेले असताना त्यात आडकाठी आणण्याचा मी प्रयत्न केला नाही. काम वेगात पूर्ण करण्यावर भर दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मावळात विदेशी दारूसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मेट्रोत चिंचवड नाव असावे असा आग्रह

मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपला मोठा आर्थिक स्वरूपात हिस्सा दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधून मेट्रो धावत आहे. पुण्यात अनेक भागात त्याचा विस्तार केला जाणार आहे. शहराची लोकभावना लक्षात घेऊन पुणे मेट्रो नावात पिंपरी चिंचवड-पुणे मेट्रो असे नाव असावे. तशी त्याला ओळख मिळावी, असे शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. पिंपरी-चिंचवड शहराची वेगळी ओळख असल्याने तशी मागणी असायला हरकत नाही, असे सांगत त्या मागणीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केले.

Back to top button