कृषी निविष्ठांच्या नमुने तपासणीसाठी 14 पथके; खरिपात 3 हजार 241 नमुने काढणार | पुढारी

कृषी निविष्ठांच्या नमुने तपासणीसाठी 14 पथके; खरिपात 3 हजार 241 नमुने काढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात चालू वर्षीच्या खरिपासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक बी-बियाणे, खते, औषधांच्या मुबलक पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना दर्जेदार मालाचा पुरवठा व्हावा आणि त्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष ठेवण्याकरिता जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या नमुने तपासणीसाठी 14 भरारी पथके कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. भरारी पथकांमध्ये जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर 13 भरारी पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 नियंत्रण कक्षही तयार करण्यात आले असून, पथकांना निविष्ठांसाठी नमुने लक्षांकही देण्यात आलेला आहे.

गावठी दारूच्या फुग्यांचा गावागावांत उच्छाद; जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा

त्यामध्ये जिल्ह्यात निविष्ठांमध्ये प्रामुख्याने खतांचे 1 हजार 874, बियाणांचे 907 आणि कीटकनाशकांचे 460 मिळून एकूण 3 हजार 241 नमुने पथकांकडून काढले जातील. याशिवाय, निविष्ठा केंद्रांच्या तपासणीचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. बियाणांची 2 हजार 406, खतांची 2 हजार 443 आणि कीटकनाशकांची 2 हजार 425 मिळून एकूण 7 हजार 274 निविष्ठा केंद्रांची तपासणी केली जाईल.

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांतर्गत एकूण 38 निरीक्षकांची संख्या आहे. गतवर्ष 2021-22 मध्ये कृषी निविष्ठा 2 हजार 131 नमुने तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 51 नमुने तपासणी पूर्ण करण्यात आली. उद्दिष्टांच्या 96 टक्क्यांपैकी अप्रमाणित निघालेल्या निविष्ठांमध्ये बियाणांचे 21, खतांचे 75, कीटकनाशकांचे 14 मिळून एकूण 110 नमुने अप्रमाणित निघाले आहेत. त्यापैकी बियाणांचे 5, खतांचे 22 आणि कीटकनाशकांचे 31 अप्रमाणित नमुन्यांमध्ये कोर्ट केस दाखल केल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button