जनकपुरीत श्रीरामाची होते वराच्या रूपात पूजा | पुढारी

जनकपुरीत श्रीरामाची होते वराच्या रूपात पूजा

काठमांडू : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या अयोध्येत धूमधडाक्यात दीपोत्सव सुरू आहे. केवळ अयोध्येतच नव्हे तर नेपाळमध्ये असलेल्या मिथिलानगरीतही असाच उत्सव सुरू आहे. हे सीतामातेचे माहेर. तेथील जनकपुरीत श्रीरामाची पूजा वराच्या रूपात होत असते. श्रीराम-जानकी विवाहावेळी अयोध्येचा राजकुमार म्हणून आलेल्या कोवळ्या वयाच्या श्रीरामाचीच याठिकाणी पूजा होते. जावई म्हणून तिथे भगवान श्रीरामाचा मोठाच सन्मान केला जातो.

मिथिलेतील पाहुणचाराची परंपरा मोठीच आहे. तिला अनुसरून जनकपुरीतील मंदिरात भगवान श्रीरामाला दिवसातून पाच वेळा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य प्रसादाच्या स्वरूपात भाविकांना दिला जातो. साधुसंत व गोरगरीब लोकांसाठी याठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था असते. तिथे रोज किमान दोनशे लोक जेवतात. मुख्य महंत राम तपेश्‍वर दास यांनी सांगितले की, सकाळी जावईबापू उठताच त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर सकाळच्या न्याहरीला ‘बाल नैवेद्य’ म्हणतात. त्यामध्ये दहीकाला व मिठाई असते. दुपारी जावयासाठी ‘राजभोग’ बनवला जातो. त्यामध्ये अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. संध्याकाळी फळांचा नैवेद्य असतो व रात्रीही राजभोग असतो.

Back to top button