डेंग्यू, मलेरिया, कोरोना आणि सर्पदंशातूनही बचावला ! | पुढारी

डेंग्यू, मलेरिया, कोरोना आणि सर्पदंशातूनही बचावला !

लंडन : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते व अनेकवेळा त्याची प्रचितीही येत असते. ब्रिटनमधून भारतात येऊन भारतीय कारागिरांना मदत करणार्‍या एका माणसाबाबत असेच घडले आहे. या माणसाने चारवेळा मृत्यूशी सामना केला. आधी त्याला डेंग्यू झाला, नंतर मलेरिया, त्यानंतर कोरोना विषाणूनेही त्याला विळख्यात घेतले. त्यामधून बरे झाल्यावर त्याला सर्पदंश झाला. मात्र, त्यामधूनही तो बचावला!

इयान जोन्स असे या भाग्यवान माणसाचे नाव. कोरोना महामारीमुळे राजस्थानमध्येच अडकून पडलेल्या या माणसाला आधी जीवघेणा डेंग्यू झाला. त्यातून बरा होताच त्याला मलेरियाने जखडले. त्यावर मात केल्यावर त्याला कोरोनाची लागण झाली. कोरोनाला हरवून घरी जाण्याची तयारी करीत असतानाच त्याला 9 नोव्हेंबरला सर्पदंश झाला. त्यामधूनही तो बरा झाल्यावर 16 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. जोन्स हे स्थानिक कारागिरांना मदत करतात. त्यांनी बनवलेल्या पारंपरिक हस्तकला वस्तूंची ते आपल्या चॅरिटी संस्थेद्वारे ब्रिटनमध्ये विक्री करण्यासाठी मदत करतात. या कारागिरांना आर्थिक अडचणीतून मुक्‍त करणे हा त्यांचा उद्देश आहे. आता एकापाठोपाठ एक आलेल्या संकटातून मुक्‍त झाल्यावर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या आगमनाची ब्रिनमध्ये वाट पाहत आहेत.

Back to top button