कलाग्राम अवतरणार महिनाभरात; पुणेकरांना पु. ल. देशपांडे उद्यानात खाद्यपदार्थांची मेजवानी | पुढारी

कलाग्राम अवतरणार महिनाभरात; पुणेकरांना पु. ल. देशपांडे उद्यानात खाद्यपदार्थांची मेजवानी

हिरा सरवदे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘महापालिका आणि स्मार्ट सिटीकडून सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात साकारण्यात येत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात सर्व कामे पूर्ण होतील, ’ असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
पुणेकरांना विविध वस्तू आणि ग्रामीण कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांसह विविध राज्यांमधील लोककला आणि खाद्यपदार्थांची मेजवानी लवकरच एका छताखाली उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

सिंहगड रस्त्यावरील पानमळ्याजवळ उद्यान साकारण्याचा ठराव महापालिकेचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अरुण धिमधिमे यांनी 2002 मध्ये मांडून तो मंजूर करून घेतला. त्यानुसार येथील 27 एकर जागेवर पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये जपानी शैलीचे आणि मुघल शैलीचे गार्डन आणि ग्रामीण कलाकृती व लोककला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 10 एकर जागेत जपानी शैलीचे गार्डन आणि 6 एकर जागेत मुघल शैलीचे गार्डन आहे. उर्वरित 2 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय आणि 3 एकर जागेवर कलाग्राम प्रकल्प साकारण्यात येत आहे, तर उर्वरित जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

अनेक वर्षे रखडलेले कलाग्रामचे काम सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असून, 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व कामे महिनाभरात पूर्ण होतील, असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. या कामासाठी महापालिका, राज्य शासन आणि स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर कलाग्राम प्रकल्प स्मार्ट सिटीकडून महापालिकेला हस्तांतरित केला जाणार आहे. त्यानंतर तो केव्हा सुरू करायचा, याचा निर्णय महापालिका घेणार आहे.

कलाग्राममध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल?

कलाग्रामचा परिसर आणि बांधकाम एखाद्या गावातील वास्तूप्रमाणे साकारण्यात आले आहे. या ठिकाणी 30 गाळे असून, त्यात एक ओपन अ‍ॅम्फी थिएटर, विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रींचे काऊंटर, दोन लायब—री, विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे 12 स्टॉल, विविध प्रकारच्या कार्यशाळांसाठी दोन खुल्या व्यासपीठांचा समावेश आहे. या ठिकाणी बांबू व दगडांपासून तयार होणार्‍या विविध वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.

Back to top button