पुणे: मंकीपॉक्स नेमका होतो तरी कसा | पुढारी

 पुणे: मंकीपॉक्स नेमका होतो तरी कसा

 पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्राण्यांना जर मंकीपॉक्स आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संबंध आला, तर माणसाच्या शरीरात हा विषाणू प्रवेश करू शकतो; तसेच रुग्णांचे वापरलेले कपडे किंवा रुग्णांशी थेट संबंध आल्यानेही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत लक्षणे दिसतात. आतापर्यंत 12 देशांत 92 रुग्ण आढळलेले आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर संशयित रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स अतिशय दुर्मीळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे होतो, त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. या विषाणूचा त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.

त्यावर उपचार काय…

लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा. दुय्यम बॅक्टरील संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत. पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. पोषक आहार देण्यात यावा.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना, अस्वस्थपणा यांचा समावेश होतो. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरावर डाग तसेच राहतात.

राज्य सरकारकडून जिल्ह्यांना सूचना

  • जे प्रवासी मंकीपॉक्सबाधित देशांतून गेल्या 21 दिवसांत आपल्याकडे आले आहेत, ज्यांच्या अंगावर पुरळ आहेत, त्यांना आरोग्य केंद्रात विलगीकरणात ठेवा.
  • संशयित रुग्णांच्या अंगावरील पुरळचे द्रव्य, रक्त, थुंकीचे नमुने एनआयव्हीला पाठवण्यात यावेत
  •  रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या 21 दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात यावा
  •  या रुग्णांना आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात यावेत. त्वचेचा संसर्ग पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत विलगीकरण संपवू नये.

Back to top button