अनोखा विवाह सोहळा! सात एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी; साईओ, पोलिस अधिक्षक बनले वधु-वरांचे मामा | पुढारी

अनोखा विवाह सोहळा! सात एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी; साईओ, पोलिस अधिक्षक बनले वधु-वरांचे मामा

बीड; पुढारी वृत्तसेवा

जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने सोमवारी (दि.23) अनोखा सामुदायिक विवाह-सोहळा बीडमध्ये पार पडला. समाजाने वाळीत टाकलेल्या सात एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांनी रेशीमगाठी बांधत ग्रहस्थाश्रमात प्रवेश केला. विशेष म्हणजे वधु-वरांच्या मागे मामा म्हणून पोलिस अधिक्षक, सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उभे राहिले. या विवाह सोहळ्याची मोठी चर्चा होत आहे.

बीड जिल्हा व्यापारी महासंघ, पोलिस दल, विहान प्रकल्प, मॉ. वैष्णोपॅलेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यामाने बीड येथील वैष्णो पॅलेस मंगल कार्यालयात मोठ्या थाटात एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेले सात जोडपे विवाहबध्द झाले. समाजातील अनेक दानशुर व्यक्तींनी या वधु- वरांना संसारोपयोगी साहित्य देण्यासाठी मदत केली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहणी यांनी या अनोख्या आणि आदर्श विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. या विवाह सोहळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके, पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातील लोक उपस्थित होते.

व्यापारी महासंघाचे मुंबई आणि दिल्ली येथील पदाधिकारी वधु- वरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. विशेष म्हणजे पोलिस प्रशासानच्या वतीने पोलिस बॅंड पथकाने या विवाह सोहळ्यासाठी वाद्य वाजवले. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला.

पोलिसांनी दिले मनी- मंगळसुत्र

बीड जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने सातही वधुंना सोन्याचे मनी- मंगळसुत्र देण्यात आले. वधु-वरांच्या मागे मामा म्हणून अधिकारी आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उभे होते. या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button