बीड : बहिणीशी अनैतिक संबंध असल्‍याच्‍या संशयातून मित्राचा खून, दुचाकीवरुन जाताना चाकुने सपासप वार | पुढारी

बीड : बहिणीशी अनैतिक संबंध असल्‍याच्‍या संशयातून मित्राचा खून, दुचाकीवरुन जाताना चाकुने सपासप वार

बीड ; पुढारी वृत्‍तसेवा बहिणीशी अनैतिक संबंध असल्‍याच्‍या संशयातून तरुणाचा धावत्या दुचाकीवर  चाकूने सपासप वार करत खून करण्‍यात आला. ही खळबळजनक घटना  २२ मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहराजवळील मंझेरी शिवारातील शांतिवन नजीक घडली. मारेकरी त्याच दुचाकीवरुन फरार झाला. ब्रम्हदेव हनुमान कदम (२६, रा. मंझेरी ता.बीड) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. सिध्देश्वर उर्फ लक्ष्मण पांडुरंग बहिरवाळ (रा.मंझेरी ता. बीड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पाेलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ब्रम्हदेव कदम हा अविवाहित हाेता. तो शेती करायचा. मित्र सिद्धेश्वरची बहिणीचे लग्‍न झाले हाेते. पतीशी पटत नसल्‍याने ती माहेरी राहत हाेती.  तिचे व ब्रम्हदेवचे संबंध असल्‍याचा सिध्देश्वर याला संशय हाेता. २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ब्रम्हदेव हा समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ यांच्यासमवेत जेवणासासाठी मंझेरी फाट्यावर गेला होता. दहा वाजता ब्रम्हदेवला सिध्देश्वर बहिरवाळने फोन करुन कुठे आहेस, असे विचारले. त्यावर त्याने धाब्यावर जेवण करत असल्याचे सांगितले.
दहा ते पंधरा मिनिटांनी सिध्देश्वर बहिरवाळ तेथे पोहोचला. त्याने जेवण केले नाही. त्यानंतर तिघे दोन दुचाकीवरुन गावी जाण्यास निघाले.

समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ एका दुचाकीवर तर ब्रम्हदेव कदम व सिध्देश्वर बहिरवाळ दुसऱ्या दुचाकीवर होते. ब्रम्हदेव हा दुचाकी चालवित असताना शांतिवनजवळ पाठीमागे बसलेल्या सिध्देश्वर बहिरवाळने त्याच्या पोटात चाकूने वार केले. दुचाकीचा ताबा सुटल्यावर दोघेही खाली पडले. त्यानंतर समोरील दोघे परत आले. तेव्हा सिध्देश्वर बहिरवाळच्या हातात चाकू व ब्रम्हदेव कदम बेशुध्दावस्थेत पडलेला आढळला. त्यास रोखण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीवरुन तो पसार झाला. त्या दोघांनी ब्रम्हदेवला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषित केले.

, घटनास्थळी उपअधीक्षक (गृह) श्रीपाद परोपकारी, बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि.संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांनी घटनास्‍थळी भेट दिली.

हे ही वाचलंत का? 

Back to top button