सांगली जिल्ह्यातील अवैधधंदे : सराईत गुन्हेगारांचे अड्डे | पुढारी

सांगली जिल्ह्यातील अवैधधंदे : सराईत गुन्हेगारांचे अड्डे

सांगली; स्वप्निल पाटील : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडीओ गेम, जुगाराचे अड्डे, कॅसिनो, क्रिकेट बेटिंगवरील अवैध व्यवहारातून अनेकदा मारामारीच्या घटना घडत आहेत. आता तर यातून खुनाच्याही घटना घडू लागल्याने या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

कुपवाड (ता. मिरज) येथे एका व्हिडिओ गेम चालकाचा पैशाचा वादतून चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. त्यामुळे अवैध धंदे गुन्हेगारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात अवैधधंदे जोमात सुरू आहेत. बिनदिख्ख्तपणे जुगार अड्डे सुरू आहेत. गर्दुल्यांनी तर अक्षरश: थैमान घातले आहे. राजकीय नेत्यांचा आश्रयाचा फायदा घेऊन नशेखोरांकडून लोकांना शिवीगाळ, दमदाटीचे प्रकार सुरू आहेत. याच कारणातून वादावादी होऊन गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत आहेत.

मिरजेत काही दिवसांपूर्वी क्रिकेट बेटिंगच्या कारणातून तुफान मारामारी झाली होती. एका राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असणार्‍या जुगार अड्ड्यात खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता.

सांगली, मिरज शहरासह कुपवाड देखील आता गुन्हेगारीच्यादृष्टीने पोलिसांच्या रडारवर आहे. कुपवाडमध्ये देखील अवैधधंदे जोमात सुरू आहेत. कुपवाडमधून मिरजेकडे विक्रीसाठी जाणारा ‘गांजा’ स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पकडला होता. ऑनलाईन व्हिडीओ गेम सेंटरमध्ये चालकाचाच ‘गेम’ झाल्याने व्हिडीओ गेम सेंटर, जुगार अड्डे आणि क्रिकेट बेटिंगचे क्‍लब हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनल्याचे समोर येत आहे.

पैशांच्या देवाण-घेवाणीतून फाळकूट दादांमध्ये जुगार अड्डे व व्हिडीओ गेम सेंटरमध्ये मारामारीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. परंतु पोलिसांच्या तावडीतून पुन्हा सुटल्यानंतर जुगार अड्डे पुन्हा नव्याने जोमाने चालविले जात असल्याचे दिसून येते. हे जुगार अड्डे व व्हिडीओ गेम चालविणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आता आली आहे.

Back to top button