‘आमवात’ आणि आयुर्वेद उपचार | पुढारी | पुढारी

‘आमवात’ आणि आयुर्वेद उपचार | पुढारी

डॉ. आनंद ओक

‘आम’ याचा अर्थ विकृत शरीरक्रियांमुळे शरीरामध्ये तयार होणारा अपक्वमलीन स्वरुपाचा विषसमान पदार्थ असा आहे. म्हणजेच पचनशक्ती कमी झाल्याने म्हणजेच अग्नीमांध्य उत्पन्न झाल्यामुळे तसेच शरीरातील धातु उत्पत्तीच्या म्हणजेच चयापचय क्रियेतील दोषांमुळे आणि नको असलेले पदार्थ शरीरातून बाहेर न पडल्यामुळे ते शरीरात साठून राहिल्यास जो पदार्थ तयार होत असतो त्याला ‘आम’ असे म्हणतात. काहीवेळा कृमी विषांमुळे देखील ‘आम’ उत्पन्न होत असतो. 

‘वात’ हा शरीरातील सर्व हालचाली सुरळीतपणे चालविणारा, नियंत्रित करणारा अदृश्य शक्ती स्वरुप भाव पदार्थ आहे. ज्या वेळी या वाताची क्रिया बिघडते त्या वेळी त्याला ‘वातप्रकोप’ असे म्हटले जाते. ज्या वेळी वातप्रकोप आणि आमाची उत्पत्ती या क्रिया एकाचवेळी शरीरात होतात आणि या बिघडलेल्या वातामुळे ‘आम’ या पदार्थाला गती उत्पन्न होते. तो सर्व शरीरात फिरू लागतो. यातूनच सांधे आणि कमरेचे सांधे याच्यात दोष उत्पन्न होवून जो विकार होत असतो, त्या विकाराला ‘आमवात’ असे म्हणतात.

आमवाताची पूर्वलक्षणे

ताप येणे, अंग जड वाटणे, सांधे जखडल्याप्रमाणे वाटणे, अंगदुखी, भूक कमी होणे, आळस, पोट जड राहणे, सांध्यांना थोडी सूज येणे, जडत्व अशी पूर्व लक्षणे आमवात होण्याआधी जाणवत असतात. साधारणपणे या वेळी अंगदुखी किंवा तापावरील मेडीकलची रासायनिक औषधे घेतली जात असतात. त्यामुळे थोडे तात्पुरते बरे वाटते, पण आजार मात्र वाढत असतो.

आमवाताच्या तक्रारी

पूर्वलक्षणे वारंवार त्रास देत असतातच पण मनगट, कोपर, खांदा, गुडघा, घोटा या सांध्यांना सूज येते. स्नायूनाही सूज येते, सांधे दुखू लागतात. सांधे गरम होतात, लाल होतात तेथे स्पर्शही सहन होत नाही, सांधे हलवणे अवघड होते किंवा सांध्याची हालचाल केल्यास वेदना वाढतात. अनेकदा एका सांध्याची सूज वेदना कमी होऊन दुसरा सांधा सुजतो दुखतो व जखडतो असे आढळते. सांध्याच्या वेदना या अत्यंत तीव्र असतात. या सांध्याच्या तक्रारीबरोबरच कमी अधिक स्वरुपात अग्नीमांध्य, भूक नसणे, तोंडाला चव नसणे, अंग गरम होणे, निरुत्साह, पोट जड राहणे, पोट साफ न होणे, लघवीला जास्त जावे लागते. जास्त झोप येणे अशा तक्रारीही जाणवत असतात. या आमवाताचे वातज, पित्तानुबंधी, कफानुबंधी असे तीन प्रकार आढळून येतात. सुरुवातीच्या काळात सांध्यांना तेल लावले असता सांध्याची सूज अधिक वाढत असते.

आमवाताचे दुष्परीणाम

आमवातावर सुरुवातीपासून शास्त्रीय उपचार न घेतल्यास नंतरच्या काळात हृदयावर दुष्परिणाम होऊन हृदयाचा आकार वाढणे, हृदयांच्या मांसपेशींची विकृती होणे, छातीत दुखणे, धडधडणे, हृदय कार्य बिघाड उत्पन्न होऊ शकतो. हृदयाबरोबरच सांधे जखडणे, हातापायाची बोटे वाकडी होणे, सांधे वाकडे होणे, उठ बस करणे अवघड होणे हे दुष्परिणामदेखील होत असतात.

आमवातावरील आयुर्वेदीक उपचार

आमवातावर उपचार करताना विकाराची सविस्तर माहिती घेवून अष्टविध परीक्षा केल्यानंतर ‘आमवात’ कोणत्या अवस्थेत आहे त्यानुसार सांघिक उपचार युक्तीने करावे लागतात. तीव्र अवस्थेत असताना, नुकतीच सुरुवात झाली असताना लंघन, अग्नीदीपन, आमपाचन, विरेचनासाठी एरंडतेल, सुंठीचा काढा इ. आमपाचन करणारी औषधे द्यावी लागतात. सांध्यावर सूज कमी करणारे, दाह कमी करणारे विविध औषधे लेप लावले जातात. याचबरोबर सूज कमी करणारी, वेदना कमी करणारी आयुर्वेदिक संयुक्त औषधे दिली जातात. आमवात होऊन जास्त दिवस झाले असल्यास, जास्त सांध्यांना त्रास होत असताना भाग रुक्ष- स्वेद, तास्वेद काहीवेळा औषधी वाफेचा शेक, तैलबस्ती, निरुहबस्ती, इ. पंचकर्म उपचार उपयोगी पडतात. याचबरोबर आमपाचन करणारी, सूज कमी करणारी, वात प्रकोप कमी करणारी, शरीरबल मनोबल वाढविणारी अशी औषधे सांघिक पध्दतीने युक्तीने वापरावी लागतात. त्रास कमी झाला तरी आमवातावरील उपचार चिकाटीने दीर्घकाळ सुरु ठेवावे लागतात हेही महत्त्वाचे.

आयुर्वेदातील सुंठ, एरंड, रास्ना, गुळवेल सहचर, देवदार, अश्वगंधा, गोक्षरु, दशमुळ, पंचकोल वरुण गुग्गुळ, या वनस्पतीज औषधे आणि कज्जली रससींदुर समीरपन्नग इत्यादी खनिज औषधांपासून तयार केलेली संयुक्त औषधांचा आमवातामध्ये कौशल्याने उपयोग केल्यास उत्तम आराम मिळतो. 

Back to top button