भाजपला मुख्यमंत्रीपदाचा पेच का पडावा? शिवसेनेचा सवाल | पुढारी

भाजपला मुख्यमंत्रीपदाचा पेच का पडावा? शिवसेनेचा सवाल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. यामुळे पेच निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेनेने भाजपला फटकारले आहे. २०१४ साली देशात मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य यश मिळताच भाजपने शिवसेनेबरोबरची ‘युती’ तोडली व २०१९ साली तसेच ‘यश’ मिळाल्याप्रमाणे गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला आहे, पण इथे ‘वैद्य’ मरणार नाही. त्यांच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे व ही संजीवनी महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे, अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपला चिमटे काढले आहेत. 

‘मुख्यमंत्री’ हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप करता येणे शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर त्या बिन ‘सत्ते’च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी? मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा पेच पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर पेच का पडावा? असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. २४ तारखेस विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण ३०-३१ तारीख उलटून गेली तरी सरकार स्थापनेच्या हालचाली नाहीत. युतीस जनादेश मिळूनही हे अंधातरी वातावरण निर्माण झाले. या काळात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी पक्षांनी आपपल्या पक्षाचा विधिमंडळ नेता निवडला आहे, पण अखिल हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे ते शिवसेना- भाजप युतीचे नक्की काय होते? सत्तापदांचे समान वाटप हा दोन पक्षांतील कळीचा मुद्दा आहे. कळ लावण्याचे तसे कारण नव्हते, पण कळ लागली आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Back to top button