Ambathi Rayudu ची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा; पण ट्विट केले डिलीट, CSK चे चाहते गोंधळात | पुढारी

Ambathi Rayudu ची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा; पण ट्विट केले डिलीट, CSK चे चाहते गोंधळात

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने (Ambathi Rayudu) चाहत्यांना चांगला धक्का दिला. त्याने ट्विट करून निवृत्तीची घोषणा केली. पण काही वेळातच त्याने हे ट्विट डिलीट केले. त्याच्या या कृतीने चाहत्यांसह क्रिकेट तज्ञही संभ्रमात पडले.

रायुडूने (Ambathi Rayudu) ट्विटमध्ये म्हटले की, ‘ही माझी शेवटची आयपीएल असेल हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. मी येथे खेळताना खूप छान वेळ घालवला आणि 13 वर्षे दोन महान संघांचा भाग राहिलो. या अद्भुत प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि CSK यांचे मनापासून आभार मानू इच्छितो.’

मात्र, हे ट्विट त्याने काही वेळातच डिलीट केले. 36 वर्षीय रायडूने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हैदराबादचा रायडू चेन्नईकडून मधल्या फळीत खेळत आहे. चेन्नईपूर्वी तो मुंबईच्या संघाचा भाग होता आणि त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रायुडूला आयपीएलच्या चालू हंगामात फिटनेसचा सामना करावा लागला आहे आणि त्याने 124 च्या स्ट्राइक रेटने 271 धावा केल्या आहेत.

2019 च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

रायुडूने (Ambathi Rayudu) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावेळी तो टीम इंडियाचा एक भाग होता. पण इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी त्याची निवड होण्याची शक्यता असूनही निवड समितीने त्याच्या जागी विजय शंकरला संधी दिली. यामुळे संतप्त झालेल्या रायुडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. नंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आले नाही.

रायुडूची आयपीएलमधील कामगिरी

रायुडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 187 सामने खेळले आहेत. यादरम्यान 174 डावात त्याने 4187 धावा केल्या. या लीगमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 100 धावा आहे. त्याची सरासरी 29.08 होती आणि त्याचा स्ट्राइक रेट 127.26 होता. त्याने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 349 चौकार आणि 164 षटकारही आले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन

रायडूने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली. देशासाठी 55 सामने खेळणाऱ्या अंबाती रायडूने 50 डावांमध्ये 47.06 च्या प्रभावी सरासरीने 1694 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 79.05 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन शतके झळकावली. 124 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 अर्धशतकेही झळकली आहेत.

Back to top button