देशात ‘बुलडोझरशाही’ला अच्छे दिन ! आता ज्या शाहीनबागेत आंदोलन झाले त्या ठिकाणी ‘बुलडोझर’ | पुढारी

देशात 'बुलडोझरशाही'ला अच्छे दिन ! आता ज्या शाहीनबागेत आंदोलन झाले त्या ठिकाणी 'बुलडोझर'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नागरिकत्व कायद्याचा (सीएए) निषेध करण्यात आलेल्या शाहीन बाग येथील अतिक्रमण हटविण्यासाठी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे (SDMC) एक पथक आज बुलडोझरसह पोहोचले, परंतु स्थानिक लोकांनी याला तीव्र विरोध केला. आता पाडकामाची मोहीम थांबवून बुलडोझर परत पाठवण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक लोकांनी स्वत:हून तात्पूरती बांधकामे हटवली आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) स्थानिक आमदार अमानतुल्ला खान यांनी मार्केट असोसिएशनशी समन्वय साधून बांधकाम हटवल्या.

हायव्होल्टेज ड्रामाच्या दरम्यान राजकीय पक्षांचे लोकही तेथे जमले होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तत्पूर्वी, पोलीस अधिकारी स्थानिक दुकानदारांशी बोलत असताना अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबवण्यात आली होती.

तत्पूर्वी, अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या एमसीडी कर्मचाऱ्यांच्या हातात लाल फिती बांधली होती, जेणेकरून त्यांची ओळख सहज व्हावी. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. मात्र, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथून हटवले. महिलांसह मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनीही एमसीडीच्या कारवाईला विरोध केला आणि लोक बुलडोझरसमोर बसले.

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान हेही अतिक्रमण हटाव कारवाईचा निषेध करण्यासाठी पक्षीय फौजफाट्यासह तेथे पोहोचले. याशिवाय काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही तेथे जमले होते. अतिक्रमण हटवण्याच्या बहाण्याने भाजप राजकारण करत असल्याचा आरोप अमानतुल्ला खान यांनी केला.

शाहीन बागेत कुठेही अवैध अतिक्रमण नाही, असे ते म्हणाले. जे काही बेकायदेशीर बांधकामे आहेत, ती आपण स्वत: हटवल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी, दक्षिण कॉर्पोरेशनमधील स्थायी समितीचे उपाध्यक्ष राजपाल सिंह यांनी सांगितले होते की, एसडीएमसी दक्षिण दिल्लीतील अनेक भागांमध्ये ४ मे ते १३ मे या कालावधीत बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू करणार आहे. या संदर्भात एसडीएमसीने दक्षिण आणि दक्षिण पूर्व डीसीपींना पत्र लिहिले.

जहाँगीर पुरीमध्ये बुलडोझरच्या कारवाईनंतर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर आणि अधिकारी अनेक भागातील अवैध धंदे हटवण्याच्या तयारीत आहेत. शाहीनबाग परिसरात सकाळपासूनच बुलडोझर येत असताना दुकानदारांनी सामान हटवण्यास सुरुवात केली.

हे ही वाचलं का ?

Back to top button