आनंद महिद्रांनी शब्द पाळला; ‘मदर्स डे’लाच इडली अम्माला दिले नवे घर | पुढारी

आनंद महिद्रांनी शब्द पाळला; 'मदर्स डे'लाच इडली अम्माला दिले नवे घर

मुंबई, पुढारी ऑनलाईन : तामिळनाडू कोईंबर जिल्ह्यात राहणाऱ्या ए. कमलाथल या खरंतर ‘इडली अम्मा’ नावाने प्रसिद्ध आहेत. कारण, इतक्या महागाईच्या काळातही त्या तामिळनाडूतील लोकांनी केवळ १ रुपयांमध्ये इडली खाऊ घालतात. त्यांचं काम पाहून महिद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिद्रा यांनी अम्माला घर देण्याचं वचन दिलं होतं. आज मदर्स डेनिमित्त त्यांनी दिलेलं वचन पाळलं आहे. त्यांच्या उदार व्यक्तीमत्वामुळे सोशल मीडियामध्ये चांगलेच कौतुक होत आहे.

आनंद महिद्रा यांनी इडली अम्माला घर बांधून दिल्यानंतर ट्विट केलं की, “मातृदिनी इडली अम्माला भेट देण्यासाठी वेळत घर बांधून दिल्याबद्दल आमच्या टीमचे खूप-खूप आभार. त्यांच्यात एका आईचे गुण… पोषण, देखभाल आणि निस्वार्थ भाव आहेत. त्यांना आणि त्यांच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी संधी मिळाल्याने आम्ही स्वतःला उपकृत समजतो. सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा”, असे ट्विट करत आनंद महिद्रा यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

१० सप्टेंबर २०१९ रोजी आनंद महिद्रा यांनी इडली अम्माचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, इडली अम्माच्या उद्योगामध्ये गुंतवणूक करणे आणि त्यांना चुलीऐवजी गॅस-स्टोव्ह देणार आहे. त्यानंतर महिद्रा यांची टीम जेव्हा अम्माला भेटायला गेली, तेव्हा अम्मांनी त्यांच्यासमोर घर देण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली.

अम्मांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा विचार करत आनंद महिद्रा यांनी त्यांच्यासाठी नवीन घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. महिद्रा लाईफ स्पेजेजने यावर काम करण्यास सुरूवात केली. मागील वर्षी घराचे बांधकाम करण्यासाठी जमिनीची नोंदणी झाली होती. आज मातृदिनाला इडली अम्माला स्वतःचे नवीन घर मिळाले आहे. त्यामध्ये इडली करण्यासाठी विशेष किचनही तयार करून देण्यात आले आहे.

Back to top button