ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय; खडकी परिसरात; फुटलेल्या जलवाहिनीकडे दुर्लक्ष | पुढारी

ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय; खडकी परिसरात; फुटलेल्या जलवाहिनीकडे दुर्लक्ष

खडकी : पुढारी वृत्तसेवा : खडकी रेल्वे स्टेशन परिसरातील सेंट थॉमस चर्चजवळ जलवाहिनी फुटल्याने ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी साचून राहात असल्याने येथील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येत आहे, याकडे पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

खडकी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस थॉमस चर्चजवळ जलवाहिली फुटल्याने औंधकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी पाणी साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वेगाने जाणार्‍या वाहनांमुळे हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. तसेच या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वरांना अपघात होण्याची शक्यता आहे. औंध रोड परिसरासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सकाळ आणि संध्याकाळी पाणीपुरवठा करण्यात येतो. या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जवळच बसथांबा असून प्रवाशांना तेथे जाणेही अपघड होत आहे. दरम्यान, या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

सेंट थॉमस चर्चजवळील रस्त्यावर डांबरीकरण करताना जलवाहिनी फुटल्याचा अंदाज आहे. मात्र, डांबरीकरणानंतर या जलवाहिनीची दुरुस्ती केली नसल्याने या ठिकाणी रस्त्यावर पाणी येत आहे. या भागात एका हॉटेलची ड्रेनेज लाइनदेखील पावसाळी वाहिनीला जोडली आहे. हे ड्रेनेज बंद करण्याची सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण पाहणी करण्यात आली असून, लवकरच या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येईल.

– पराग सावरकर, अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका

हेही वाचा

Back to top button