Mobile addiction : तुम्हाला मोबाईलचं व्यसन जडलंय; डिटाॅक्स करण्यासाठी ‘हे’ उपाय करा | पुढारी

Mobile addiction : तुम्हाला मोबाईलचं व्यसन जडलंय; डिटाॅक्स करण्यासाठी 'हे' उपाय करा

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : आपण सगळे डिजिटल युगात वावरतो. आपल्या हातात असणारा मोबाईल (Mobile Phons) फोन माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामध्ये असणाऱ्या विविध समाज माध्यमांचा (Social media) अगणितपणे झालेल्या प्रसार आणि त्यातून मिळणारी प्रसिद्धी आपल्याला हवीहवीशी वाटत असली तरी त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम अगदी लहानग्यांपासून थोरांपर्यंत आता जाणवू लागलेले आहेत. (Mobile addiction)

मोबाईलचे व्यसन हे लहान मुलांपासून वयस्क नागरिकांपर्यंत सर्वांना लागलेले आहे. त्यामध्ये एक आई आपल्या बाळाला भरविताना त्याच्या हातात मोबाईल सुरू करून देते. मोठमोठे क्रिकेटर्सच्या ऑनलाईन रमी खेळण्याच्या जाहिराती पाहून ऑनलाईन जुगाराच्या आहारी तरुण जात आहेत. सतत सोशल मीडियाचे नोटिफिकेशन चेक करण्याची सवय लागलेली आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण जरी विद्यार्थ्यांपर्यंत गेले असले तरी त्यातून विविध पाॅर्न व्हिडिओ पाहण्याची मुलांना सवय लागलेली आहे. या सर्व प्रकाराला मानसशास्त्रामध्ये ‘स्क्रीन डिपेन्डन्सी डिसऑर्डर’ असे म्हटले आहे. (Mobile addiction)

चिकित्सक मानसशास्त्रज्ञ संजय कुंभार सांगतात की, “फेसबुक, व्हाॅट्स अपवर आलेले मॅसेज चेक करणे. सोशल मीडियावरील रिल्स तासंतास पाहत बसणे. इतरांचे स्टेट्स वाचून मला असं का जगता येत नाही, अशी भावना या मोबाईल वापरकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये अगदी सहज पाॅर्न व्हिडीओ पाहण्याची सोय झालेली आहे, त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होताना दिसत आहे. यातून पालकांनी मोबाईल काढून घेतला की, त्यांची हत्या करण्यापर्यंत ही मुले जाताना दिसत आहेत.”

“लहान मुलांना भरविताना महिला जास्त कष्ट घेताना दिसत नाहीत. सरळ त्या मुलाच्या हातात मोबाईलवर कार्टून्स किंवा व्हिडीओ सुरू करून देतात. पूर्वी आजी-आजोबा किंवा पालक गाणी गाऊन खाऊ भरवायच्या. आता तेच काम मोबाईल करत आहे. यातून लहान मुलांना मोठ्या प्रमाणात मोबाईल स्क्रिनची सवय लागली आहे. इतकंच नाही तर जोपर्यंत टीव्ही, काॅम्प्युटर किंवा मोबाईलचा स्क्रीन दिसत नाही, तोपर्यंत मोठी माणसंदेखील जेवत नाहीत. थोडक्यात मोबाईलचं व्यसन समाजाता मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे”, असेही संजय कुंभार म्‍हणाले.

मोबाईल व्यसनाधीनतेवर उपाय काय? (Digital Detox) 

नोटीफिकेशन बंद करणे : अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर ईमेल, फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इतर तत्सम अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन चेक करण्याची सवय असते. रात्री झोपताना मोबाईलचा इंटरनेट डेटा बंद करणे किंवा नोटिफिकेशन ऑफ करून ठेवणे ही, डिजिटल डिटाॅक्सची उत्तम पद्धत आहे. सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचणे, अगदी योग्य आहे.

जेवताना स्क्रीन पाहायचा नाही : जेवणाच्या वेळी संपूर्ण लक्ष खाण्याकडे असणे खूप महत्त्‍वाचे आहे. त्यामुळे जेवत असताना कोणताही स्क्रीन पाहू नये. असे केल्याने शरीर आणि मन निरोगी राहते.

रात्री मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवणे : डिजिटल डिटाॅक्स प्रभावीपणे पार पाडायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा आणि तो मिळालेला वेळ आपल्या कुटुंबाबरोबर घालवा.

झोपताना मोबाईल दूर ठेवा : रात्री झोपण्यापूर्वी १ तास अगोदर तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर ठेवा. कारण, मोबाईलमधून निघणारा निळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या डोळ्यांसाठी हानीकारक असतो. जर महत्त्‍वाचे मॅसेज येत असतील, तर त्याची माहिती ऐकू येणारी अ‍ॅप्सदेखील बाजारात आहेत, त्याचा वापर करा.

हे वाचलंत का ?

Back to top button