Sukma Encounter | छत्तीसगडच्या सुकमात चकमक, एक नक्षली ठार | पुढारी

Sukma Encounter | छत्तीसगडच्या सुकमात चकमक, एक नक्षली ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षा दलाचे एक पथक नक्षलविरोधी ऑपरेशन राबवत असताना तोलनई आणि टेटराई गावांदरम्यानच्या जंगलातील टेकडीवर ही चकमक झाली.

या भागात नक्षली असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या दरम्यान नक्षली आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक उडाली. येथील गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा जवानांना घटनास्थळावर एका नक्षलीचा मृतदेह आढळून आला. तसेच या ठिकाणावरून एक लोडिंग बंदूक आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. मृत नक्षलीची ओळख अद्याप पटलेली नाही आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

या घटनेमुळे या वर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या १०५ वर पोहोचली आहे. १० मे रोजी विजापूर जिल्ह्यात अशाच एका चकमकीत डझनभर नक्षलवादी ठार झाले होते.

पोलिसांच्या अहवालानुसार, ३० एप्रिल रोजी झालेल्या आणखी एका चकमकीत नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात तीन महिलांसह १० नक्षलवादी ठार झाले होते. याव्यतिरिक्त, १६ एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ नक्षलींना मारण्यात आले होते. 

 हे ही वाचा :

Back to top button