सिंहायन आत्मचरित्र : ‘सकाळ’चे हस्तांतरण | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : ‘सकाळ’चे हस्तांतरण

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

वर्ष 1988…
कथा-कादंबर्‍या, चित्रपट, नाटक आणि मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक रहस्यकथा, सुरस, चमत्कारिक कथा वाचत किंवा पाहत असतो. त्या पाहत किंवा वाचत असताना आपण भारावून जातो. मात्र, महाराष्ट्रातही सुमारे तीस वर्षांपूर्वी पत्रकारितेच्या पटलावर अशीच एक भन्नाट कथा घडली होती. एक सत्यकथा! आजच्या पिढीला ती ज्ञात नसली, तरी मी त्या कथेचा एक हिस्सा होतो, त्यामुळे मी ती कधीच विसरू शकणार नाही.

विशेष म्हणजे या कथेत मोठी रंजकता आहे. ललित साहित्याच्या विविध गुणांनी ती परिपूर्ण आहे. अन् महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील एक मातब्बर राजकीय नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, असे एक महान नेते या कथेतील मुख्य नायक आहेत. त्यांचं नाव ‘शरद पवार!’

डॉ. ना. भि. परुळेकर या एका ध्येयवादी पत्रकारानं अथक परिश्रमातून उभारलेलं, दैनिक ‘सकाळ’ हे पवार कुटुंबीयांचं कसं झालं याची ही सुरस कहाणी! अर्थात, ही कथा ‘फ्लॅश बॅक’ पद्धतीनं सुरू होत असल्यामुळे ‘पूर्वावलोकन’ इथं आवश्यक आहे.

डॉ. ना. भि. परुळेकर आणि त्यांच्या पत्नी शांताबाई यांनी 1932 मध्ये पुणे येथून दै.‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केलं. पुढे 1948 मध्ये डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर आणि शांताबाई यांनी, ‘मे. सकाळ पेपर्स प्रा. लि.,’ या नावानं एक कंपनी स्थापन केली. मी पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजला 1966 साली शिकत होतो व त्यावेळी हॉस्टेलला राहात होतो. सुशीलकुमार शिंदे हे त्यावेळी आमच्याच विंगमध्ये हॉस्टेलला राहात होते. विलासराव देशमुख नंतर आले, पण ते हॉस्टेलला दुसर्‍या विंगमध्ये राहात होते.

त्यावेळी आमच्याबरोबर भाई पंडित, खा. श्रीनिवास पाटील यांचे बंधू प्रताप पाटील, सुभाष झाडबुके, सतीश पारेख, गव्हाणे, शिवाजी जगताप असे मित्र होते. शरद पवार हे आम्हाला सिनिअर, पण ते बीएमसीसीला होते व लगेच महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या सर्वांशी माझे त्यावेळपासूनचे संबंध होते.
पुण्यात असताना मी लॉ कॉलेजबरोबरच पुणे विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात वृत्तपत्र विद्येचे शिक्षण घेत होतो. त्यावेळी मी रात्री केसरी, सकाळ, तरुण भारत, विशाल सह्याद्री या दैनिकांतही जात असे.

माझे त्यावेळपासून जयंतराव टिळक, नानासाहेब परुळेकर, भिशीकर, अनंतराव पाटील यांचेबरोबर जवळचे संबंध होते. पुढे माझे शिक्षण झाल्यावर व मी ‘पुढारी’ची सूत्रे हातात घेतल्यावर देखील माझे सवार्र्ंशी चांगले संबंध होते. 1970 साली मी व नानासाहेब परुळेकर – आम्ही दोघे भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून फिलिपाईन्सच्या दौर्‍यावर एकत्र गेलो होतो. माझे नानासाहेबांशी जवळचे संबंध असल्यामुळे मला त्यांच्याकडून काही मार्गदर्शनही होत असे. परंतु 1973 मध्ये नानासाहेबांचे निधन झाल्यानंतर सकाळची सूत्रे त्यांच्या कन्या लीलाताई व पत्नी शांताबाई यांच्या हातात आली. त्यांच्याशीही माझी नेहमी चर्चा होत असे.

नानासाहेब परुळेकर यांनी आपल्या हयातीत ‘एक्झिक्युटर्स अ‍ॅण्ड ट्रस्टीज टू द इस्टेट ऑफ नानासाहेब परुळेकर’ या नावानं एक ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टकडे मे. सकाळ पेपर्स प्रा. लि. चे 3417 शेअर्स होते. या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून शांताबाई परुळेकर आणि नानासाहेब परुळेकर यांचे निकटवर्ती बानूबाई कोयाजी आणि जसवंतलाल मटुभाई हे लोक काम पाहत होते.

परुळेकरांचा त्यांच्यावर दांडगा विश्वास होता. मे. सकाळ पेपर्स प्रा. लि. कंपनीचे एकूण 7500 शेअर्स होते. त्यापैकी 3417 शेअर्स या ट्रस्टचे होते. बानूबाई कोयाजी आणि जसवंतलाल मटुभाई हे दोघे कंपनीचे भागधारक आणि संचालकही होते. ट्रस्टकडे असलेले 3417 शेअर्स आणि बानूबाई कोयाजी नि जसवंतलाल मटुभाई यांचे व्यक्तिगत शेअर्स मिळून एकूण चार हजारांहून अधिक शेअर्स होते.

नानासाहेब परुळेकर वारल्यानंतर काही वर्षांनी एकदा शरद पवारांनी एका भेटीत मला त्यांची सकाळबाबतची इच्छा प्रदर्शित केली. शरद पवार म्हणाले, “बाळासाहेब, मला सकाळचे शेअर्स घ्यावयाचे आहेत व तुम्ही लीलाताईंना त्याबाबत विचारा.” मी लीलाताईंना भेटलो व ही गोष्ट त्यांना सांगितली. लीलाताईंनी मला स्पष्टच सांगितलं की, मी ‘सकाळ’चे शेअर्स विकणार नाही व दुसर्‍या ट्रस्टींनादेखील कोणाला विकू देणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी यात भाग घेऊ नये. मी ही गोष्ट शरद पवारांच्या कानावर घातली. त्यानंतर मला वाटले की, शरद पवारांनी बहुतेक तो विषय थांबवला आहे.

डॉ. परुळेकर यांच्या निधनानंतर बानूबाई कोयाजी आणि जसवंतलाल मटुभाई यांना शरद पवार यांनी विश्वासात घेतलं. अर्थात, शरद पवार हे पद्धतशीरपणे हवं ते घडवण्यात कमालीचे हुशार, हे सांगणे न लगे!

तर, ‘सकाळ’ कंपनीचे हे चार हजारांहून अधिक शेअर्स पवार कुटुंबीयांनी पन्हाळा इन्व्हेसमेंट प्रा. लि., टेंबलाई इन्व्हेसमेंट प्रा. लि., यशद हॉस्पिटल प्रा. लि., नम्रता फिल्म एंटरप्राईज प्रा. लि., या आपल्या कंपन्यांच्या नावांनी खरेदी केले. खरं तर बानूबाई कोयाजी आणि जसवंतलाल मटुभाई हे नानासाहेबांचे निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून गणले जात. तरीही त्यांनी ते शेअर्स पवार कुटुंबीयांना परस्पर विकून टाकले. वास्तविक, ‘सकाळ’च्या शेअर्सधारकांना आपले शेअर्स विकायचे असतील, तर ते कराराच्या मूळ ढाच्यानुसार ‘सकाळ’च्या शेअर्सधारकांनाच विकायला हवे होते. बाहेरील व्यक्तीला अथवा संस्थेला शेअर्स विकणे बेकायदेशीरच होतं. याच मुद्द्यावरून नानासाहेब परुळेकरांच्या कन्या लीलाताई परुळेकर यांनी या व्यवहाराला आक्षेप घेतला आणि 7 ऑगस्ट 1980 रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला.

न्या. वरिआवा यांच्या न्यायालयात ही याचिका सुनावणीसाठी आली. या याचिकेवर न्या. वरिआवा यांनी लीलाताई परुळेकरांच्या बाजूनं निकाल दिला. परंतु, निकाल देतानाच, लीलाताई परुळेकर यांनी पवारांनी ज्या किमतीला शेअर्स घेतले, ती रक्कम न्यायालयात भरावी, असाही आदेश दिला. ती रक्कम लाखोंच्या पटीत होती. ही रक्कम भरल्यानंतरच लीलाताई परुळेकरांच्या नावे शेअर्स वर्ग करावेत, असा स्पष्ट आदेशच दिला. त्यावेळी लीलाताईंसाठी ही रक्कम डोंगराएवढी मोठी होती. न्यायालयाकडे त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी काही मुदत मागून घेतली. न्यायालयानंही ती मंजूर केली.
इथं कथेचं ‘फ्लॅश बॅक’ संपतं. आता ‘कट बॅक’ सुरू होतं..!

लीलाताई परुळेकर यांच्यासमोर ही रक्कम उभी करणं हे मोठं आव्हान होतं. त्यांनी वसंतरावदादा पाटील, शंकरराव चव्हाण, इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे रामनाथ गोयंका तसेच तत्कालीन भाजप खासदार अण्णा जोशी अशा अनेक दिग्गजांचा दरवाजा ठोठावला. सुरुवातीला त्या लोकांनी आपले दरवाजे उघडलेही; परंतु नंतर त्यांनी ते परत बंद करून घेतले. लोक असे तोंड का फिरवताहेत, त्याचं कारण लीलाताईंच्या ध्यानी येत नव्हतं.

एखाद्या रहस्यमय कथेसारखाच हा घटनाक्रम होता. नव्हे, ती एक उत्कंठावर्धक रहस्यकथाच होती! अखेर लीलाताईंनी कोल्हापूरला येऊन माझी भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका माझ्यापुढे विशद करून मला सहकार्य करण्याबद्दल विनंती केली. मी त्याच मीटिंगमध्ये त्यांच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली. त्यानंतर आमची पुढची भेट पुण्यातील भांडारकर मार्गावर असलेल्या लीलाताईंचे वकील श्री. हेरेकर यांंच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी पुन्हा एकदा त्या विषयावर सांगोपांग चर्चा झाली.

या चर्चेतून समोर आलेल्या अटी आणि शर्ती मलाही मान्य झाल्यानं मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर लगेचच मी मुंबईतील माझे मित्र चार्टर्ड अकौंटंट आर. बी. वस्त यांच्याबरोबर क्रॉफर्ड अँड बेली या प्रख्यात सॉलिसिटर फर्मचे सिनिअर पार्टनर अशर यांच्याकडून एक सामंजस्य करार (एमओयू) तयार करून घेतला.

कराराप्रमाणे लीलाताई परुळेकरांना रक्कम द्यायचं मी मान्य केलं. त्याप्रमाणे मी कोल्हापुरातील युनायटेड वेस्टर्न बँकेतून (सध्याची आयडीबीआय बँक) दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी 1988 रोजी ‘प्रोथोनोटरी, हायकोर्ट बॉम्बे’ या नावानं डिमांड ड्राफ्ट काढले. ही बाब मी माझे बंधुतुल्य मित्र डी. वाय. पाटील यांच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनीही ‘सकाळ’चे शेअर्स घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेला मी मान दिल्यानंतर त्यांनीही मग ‘प्रोथोनोटरी, हायकोर्ट बॉम्बे’ या नावानं डी. डी. काढला. मी ते लगेचच लीलाताई परुळेकरांकडे सुपूर्द केले.

याचिकेच्या सुनावणीवेळी लीलाताईंनी न्या. वरिआवा यांच्या न्यायालयात ते डी. डी. जमा करायला हवे होते; पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी उलट ते डी. डी. फक्त कोर्टाला दाखवले आणि कोर्टाकडून आणखी एक महिन्याची मुदत मागून घेतली. त्याच्यामागेही एक सयुक्तिक कारण होतं. त्यांना आतून कुठून तरी असं वाटत होतं की, त्या तेवढ्या रकमेची तरतूद करू शकतील. माणसाला आशा फार वाईट असते!

लीलातार्ईंची महाबळेश्वरला प्रॉपर्टी होती. या प्रॉपर्टीवर त्यांनी स्टेट बँकेकडे कर्ज मागितलं होतं. यदाकदाचित कर्ज मंजूर झालं नाहीच, तर ती प्रॉपर्टी विकून त्यांना रक्कम उभी करायची होती. परंतु, जेव्हा त्यांनी कर्जाबाबत स्टेट बँकेकडे रीतसर विचारणा केली, तेव्हा कर्ज विभागातील अधिकार्‍यांनी कर्ज मिळेल आणि प्रोसेस सुरू असल्याचं ठामपणे सांगितलं.

परंतु, प्रत्यक्षात मात्र दिवसामागून दिवस जाऊ लागले तरी बँकेची कागदपत्रे हलत नव्हती! निव्वळ ‘टाईम किलिंग’ चाललं होतं. लीलाताईंना निव्वळ झुलवत ठेवण्याची ती एक खेळी होती. मात्र, बँकेनं त्यांना कर्ज मंजूर केलं नाही! त्यांच्या आशेची निराशा झाली होती!
दरम्यान, पवार यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे डीडीची झेरॉक्स मागितली. त्याप्रमाणे न्यायालयाचा आदेश होताच डीडीची झेरॉक्स त्यांना देण्यात आली. साहजिकच युनायटेड वेस्टर्न बँक, कोल्हापूर येथून हे डी. डी. काढल्याचं वकिलांच्या लक्षात आलं. वकिलांनी त्वरित शरद पवार यांना सदरचे डी. डी. कोल्हापूरच्या शिवाजी चौकातील युनायटेड वेस्टर्न बँकेतून काढल्याचं सांगितलं. त्या काळात ही रक्कम फारच मोठी होती. कोल्हापुरातून डी. डी. काढल्याचं निदर्शनास येताच शरद पवारांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी तातडीनं हालचाली केल्या आणि हे डी. डी. कोणी काढले, याची माहिती मिळवली. त्यांना ‘पुढारी’चं नाव समजलं.

त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये होते, पण ते सत्तेत नव्हते. एकदा माहिती हातात आल्यानंतर शरद पवार यांनी तत्काळ कोल्हापुरातील माझ्या बंगल्यावर फोन केला. तेव्हा मी मुंबईतच असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी लगेचच मुंबईतील ताडदेव येथील माझ्या फ्लॅटवर फोन लावला आणि माझ्याशी संपर्क साधला.
“थोडं बोलायचं होतं; पण आज मुंबईत राष्ट्रपतींचा दौरा आहे. राष्ट्रपतींचा दौरा झाल्यानंतर मी रात्री तुमच्या फ्लॅटवर येतो.” शरद पवार म्हणाले.
“तरी किती वाजता याल?” मी विचारलं.
“ठीक अकरा वाजता!”
“या!”
त्यांनी रीसिव्हर ठेवला.

शरद पवारांच्या राजकारणातील स्थानाचा विचार करता, तसेही त्यांचे माझे मैत्रीपूर्ण संबंध होतेच. मी त्यांना भेटीस बोलावले. शिवाय त्यांच्यापर्यंत डीडीची बातमी पोहोचली असणार, याचीही मला जाणीव होती. मलाही ते लपवून ठेवण्याची इच्छा नव्हती.

वेळेच्या बाबतीत पवार कधीच चुकत नाहीत. बरोबर रात्री अकरा वाजता आपल्या गाडीतून ते माझ्या फ्लॅटवर आले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता ते मूळ मुद्द्यावर आलेच. त्यांनी डीडीची गोष्ट काढली.

शरद पवारांनी मला सांगितले की, तुम्ही लीलाताई परुळेकरांना ‘सकाळ’च्या शेअर्ससाठी कोर्टात भरण्यासाठी जे डी. डी. दिले आहेत ते मागे घ्यावेत. त्यांनी मला सांगितले की, त्यांना पुण्यातील ‘सकाळ’ची मालकी पाहिजे आहे आणि मी त्यांना त्यात मदत करावी. मी प्रथमतः त्यांना मुळीच दाद दिली नाही. मी शरद पवारांना सांगितले की, मी व्यावसायिक द़ृष्टिकोनातून ‘सकाळ’चे शेअर्स घेतले आहेत, नाहीतर ‘सकाळ’ कोणातरी अमराठी धनाढ्य व्यक्तीच्या हाती जाईल, त्यापेक्षा मी घेणे बरे. या मुद्द्यावर मी अडून राहिलो; पण पवार अक्षरशः गळीच पडले होते.

“त्यामध्ये एक डी. डी. हा डी. वाय. यांचा आहे. त्यांच्याशी चर्चा करून मी तुम्हाला सांगतो,” असं मी त्यांना म्हणालो. त्यावेळी डी. वाय. पाटील मुंबईत होते. पवारांची नि माझी जवळीक जवळजवळ एका तपाची असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीची मला चांगलीच जाणीव होती. खरं तर एक पत्रकार म्हणून आणि ‘पुढारी’चा संपादक म्हणून मला कुठल्याच राज्यकर्त्याचं कधीच भय वाटलं नाही.

त्यावेळी डी. वाय. पाटील हे हाजी अली येथील परेश बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर राहात होते. तेवढ्या रात्री माझ्या ताडदेव येथील फ्लॅटमधून मी आणि शरद पवार डी. वाय. पाटील यांच्या फ्लॅटवर गेलो. मी शरद पवारांना क्रॉफर्ड अ‍ॅण्ड बेली या कंपनीने आमच्यातील व लीलाताई यांच्यातील केलेला एमओयू, सामंजस्य करार दाखवला. त्या ठिकाणी पुन्हा सविस्तर चर्चा झाली. इतकंच नव्हे, तर लीलाताईंकडचे डी. डी. आम्ही परत घेतले तर लीलाताईंबरोबर झालेल्या ‘एमओयू’मधल्या अटींचं आम्हीही पालन करू, असं पवारांनी आम्हाला सांगितलं. यावेळी योगायोगानं त्या ठिकाणी कोल्हापूरचे माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामराव भिवाजी पाटील हेही आले होते आणि या चर्चेचे ते एकमेव साक्षीदारही होते.

डी. वाय. पाटील यांच्या घरी बसून चर्चा करीत असताना, मी आणि लीलाताई सकाळ केसच्या तारखेच्यावेळी उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये बसून जी काही चर्चा केली होती, त्या चर्चेचा पूर्ण तपशीलच शरद पवारांनी त्यावेळी विशद केला. समोरच्या माणसाची गुपितं फोडून ती त्याच्याच तोंडावर मारायची आणि त्याला नामोहरम करायचा, याबाबतीत शरद पवार माहीर आहेत.
पण माझा स्वभावही तितकाच चिकित्सक! त्यात काही संशयास्पद वाटलं, तर मी अधिकच सतर्क होतो. त्यामुळे मला लगेचच शंका आली. माझी स्मृती चाळवली. मन पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये गेलं…!

या घटनाक्रमापाठीमागचं रहस्य असं होतं की, शरद पवारांचे एक निकटवर्ती शिवाजीराव घुले हे नेहमी लीलाताईंच्या समवेत असत. त्यांनी लीलाताईंना मदत करण्याचा बुरखा पांघरला होता. मात्र, तो शरद पवारांनी पेरलेला माणूस होता, याची यत्किंचितही कल्पना लीलाताईंना कधी आली नव्हती. हे शरद पवारांचं ‘मेषपात्र’ लीलाताईंच्या प्रत्येक हालचालींची माहिती शरद पवारांना जाऊन देत असे!

घुलेंच्याकडून माहिती कळताच शरद पवार लगेचच लीलाताईंना मदत करू इच्छिणार्‍या प्रत्येकाशी संपर्क साधत आणि ‘या प्रकरणात भाग घेऊ नका’ अशी त्यांना विनंती करीत. अर्थात, पवारांची विनंती म्हणजे आदेशच जणू! पवारांचं राजकीय वजन लक्षात घेऊन स्वाभाविकच संबंधितांकडून लीलाताईंना नकार मिळत असे!

उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये मी आणि लीलाताई चर्चा करीत असताना तिथं लीलाताईंच्या बरोबर आलेली आणखी एक व्यक्ती हजर होती. तिचं नाव शिवाजीराव घुले!

“आमच्यातल्या संवादाची इतकी माहिती तुमच्याकडे कशी? शिवाजीराव घुले यांनी सांगितली का?” मी सरळच पवारांना विचारलं.
त्यावर पवार खळखळून हसले आणि त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता खुलासा केला,
“होय! घुले हा माझाच पेरलेला माणूस होता! मी सुरुवातीपासूनच त्याला लीलाताईंसोबत ठेवलं होतं! त्याच्याकडूनच मला लीलाताईंच्या सर्व हालचाली कळत होत्या!”

यावरूनच एकंदरीत शरद पवार कसे धोरणी गृहस्थ आहेत, हे समजून येण्यास हरकत नाही. डी. वाय. पाटील यांच्या फ्लॅटवरील त्या बैठकीमध्ये शरद पवारांनी मला पुन्हा सहकार्याची भीड घातली. लीलाताईंना दिलेले डी. डी. परत घ्यावेत, अशी त्यांची आग्रहाची विनंती होती. मग डी. वाय. पाटील यांनी मला बाजूच्या खोलीत नेलं आणि ते समजावणीच्या सुरात म्हणाले,

“मला वाटतं, आपण पवारांचं म्हणणं मान्य करूया. ते परत सत्तेत येणार आहेत. त्यांच्याशी शत्रुत्व घेणं निदान मला तरी परवडणार नाही. कारण कोल्हापूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणी मेडिकल कॉलेजीस सुरू करण्याचा माझा विचार आहे. आता जर पवारांचं आपण ऐकलं नाही, तर ते मला नडू शकतात.”

मी डी. वाय. यांना सांगितले, “तुम्ही तुमचे डी. डी. परत घ्या म्हणजे तुम्हाला शरद पवारांचे शत्रुत्व घेण्याचे कारण नाही. लीलाताईंना मी माझे दुसरे डी. डी. देतो.” डी. वाय. पाटील मग निरुत्तर झाले. यावेळी डी. वाय., शरदराव, शामराव भिवाजी सर्वच मला समजवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी परत एकदा डी. वाय., मी व शामराव दुसर्‍या खोलीत गेलो. डी.वाय.नी तेथे मला अगदी कळकळीची विनंती केली. ते म्हणाले, “बाळासाहेब, शरद पवार महत्त्वाकांक्षी आहेत. ते आता जरी सत्तेत नसले तरी ते पुन्हा मुख्यमंत्री होणार, त्यामुळे माझी अडचण होणार आहे. मला कोणत्याही परिस्थितीत मुंबई व कोल्हापूर येथे दोन मेडिकल कॉलेजीस पाहिजे आहेत.” डी. वाय. पाटील हे माझे बंधुतुल्य मित्र. मी त्यांना ज्येष्ठ बंधूच मानतो. त्यामुळे मलाही डी.वायंचे मन दुखवायचे नव्हते.

शेवटी सर्वांगीण विचार करून मी डी.वाय.ना होकार दिला. झाले! आम्ही बाहेर आलो. शरद पवार आमची चातकासारखी वाट पाहत होते. डी. वाय. मला म्हणाले, “बाळासाहेब, तुम्हीच सांगा म्हणजे शरदरावांचा विश्वास बसेल.” मी शरद पवारांना आमच्या चर्चेचा तपशील सांगितला व म्हणालो,

“मी उद्या लीलाताईंच्याकडून डी. डी. परत घेतो, पण ज्यावेळी तुम्ही सत्तेत याल त्यावेळी डी.वाय.ना कोल्हापूर व मुंबई – दोन्ही ठिकाणी मेडिकल कॉलेज दिले पाहिजे.” शरद पवारांनी माझ्या म्हणण्याला त्वरित होकार दिला.

अखेर बाहेर येऊन आम्ही शरद पवारांना आमचा होकार सांगितला. त्यावेळी त्यांना जो आनंद झाला, त्याचं वर्णन शब्दांत करणं अशक्य आहे.
या सर्व चर्चेला कर्मधर्म संयोगानं शामराव भिवाजी पाटील साक्षीदार होतेच! अशा तर्‍हेनं आमचा हा तोंडी ‘एमओयू’ झाला!
दुसर्‍या दिवशी बॅलॉर्ड पीयर येथील ग्रँड हॉटेलमध्ये लीलाताई परुळेकर यांना भेटून मी डी. डी. परत घेतले.
“तुम्हाला शरद पवार भेटलेले दिसतात!” असे विषादपूर्ण उद्गार लीलाताईंनी काढले.

त्यांना ‘सॉरी’ म्हणताना मला फार त्रास झाला. कारण मी ‘सॉरी’ म्हणावं लागावं असं कुठलंच काम कधी करीत नाही. शरद पवारांमुळे मला आज ‘सॉरी’ म्हणावं लागलं. मला लीलाताईंबद्दल खूपच वाईट वाटत होतं. आजही माझ्या मनात ती खंत कायम आहे. खरं तर नानासाहेब परुळेकरांच्या एकमेव वारसदार म्हणून ‘सकाळ’वर त्यांचाच अधिकार होता.

निरपेक्षपणे मी पवारांचा शब्द मानला. त्यांच्या शब्दाला किंमत दिली. सहजपणे ‘सकाळ’ ताब्यात घेण्याची आलेली संधी मी केवळ पवारांच्या शब्दासाठी सोडून दिली. माझ्या या सहकार्यामुळेच ‘सकाळ’वर पवार कुटुंबीय मालकी मिळवू शकले. 30 वर्षांपूर्वी घडलेल्या या पडद्यामागच्या घडामोडी आणि हा इतिहास कोणाला फारसा ठाऊक नाही.

मी आणि डी. वाय. पाटील यांनी जर लीलाताईंना दिलेले डी. डी. परत घेतले नसते, तर काय झालं असतं? तर मग ‘सकाळ’ कधीच पवार कुटुंबीयांच्या हाती लागला नसता. त्याऐवजी आज मी आणि डी. वाय. पाटील ‘सकाळ’चे शेअर होल्डर झालो असतो. मी लीलाताई परुळेकरांशी जो सामंजस्य करार (एमओयू) केलेला होता, त्यात तशी स्पष्टपणे तरतूद केलेली होती. त्या तरतुदीप्रमाणे मी आणि पाटील यांच्याकडेच ‘सकाळ’ची मालकी गेली असती.

परुळेकरांचा ‘सकाळ’ पवार कुटुंबीयांकडे कसा गेला, त्याची ही ‘सत्यकथा’ असून ती पवारांच्या पुढील पिढ्यांनाही ज्ञात असण्याची शक्यता तशी कमीच. मात्र, इतिहास हा इतिहासच असतो आणि तो पुसता येत नाही.

‘सकाळ’चे हे नाट्य घडत असताना शरद पवार हे स्वतः सर्व चर्चा-भेटी करत असत. डी. डी. परत घेतल्यानंतरदेखील ते बर्‍याचवेळा मला आणि डी.वाय.ना भेटण्यासाठी येत. डी. वाय. यांचे पेडर रोडवर जसलोक हॉस्पिटलसमोर एक ऑफिस होते. त्याठिकाणी आम्ही – मी, डी. वाय. व शरद पवार चर्चा करत बसत असू. त्यांना भीती होती की, मी परत लीलाताईंना काही मदत करणार नाही ना? आमच्या चर्चेत सकाळचे नंतर झालेले अध्यक्ष प्रतापराव पवार कधीच भाग घेत नसत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत लीलाताई रक्कम भरू न शकल्यामुळे त्यांचा दावा निकाली काढण्यात आला. दरम्यान, पुढे राजकीय घडामोडीत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण दिल्लीस केंद्र सरकारमध्ये गेले. त्यांच्याजागी 26 जून 1988 रोजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर डी.वाय.नी त्यांच्याकडे मेडिकल कॉलेजची मागणी केली. परंतु, पवारांनी त्यांना काही दाद दिली नाही. मग डी.वाय.नी मला, शरद पवारांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी करण्याची विनंती केली.

विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतानाच मी शरद पवारांची विधिमंडळातील त्यांच्या अँटीचेंबरमध्ये भेट घेतली. मी त्यांना म्हणालो,
“सकाळ प्रकरणात आपण डी. वाय. पाटील यांना मेडिकल कॉलेज देण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणं त्यांना कॉलेज द्यावीत.”
त्यावेळी शरद पवार म्हणाले, “मेडिकल कॉलेज चालवणं एवढं सोपं नाही. महाविद्यालय प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असूनही सोलापूरचं वैशंपायन मेडिकल कॉलेज चाललं नाही. आधी ते इंजिनिअरिंग कॉलेज व्यवस्थित चालवू देत!”

पवार दिलेला शब्द पाळत नाहीत, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात नेहमीच असते. त्याचा अनुभव डी.वाय.ना व मला आला, असंच म्हणावं लागेल.

पवारांनी घेतलेली ही भूमिका पाहून मला धक्काच बसला. मग मात्र मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, “तुम्ही शब्द दिल्याप्रमाणं मी लीलाताई परुळेकरांना दिलेले डी. डी. त्यांच्याकडून परत घेतले. त्यावेळी आमचा तुमच्या शब्दावर विश्वास होता. त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. मेडिकल कॉलेज चालतं की नाही, याचा विचार न करता डी. वाय.ना कोल्हापूर आणि मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजची परवानगी द्यावी!”

माझ्या या रोखठोक भूमिकेनं पवार क्षणभर विचलित झाले आणि त्यांनी होकार देऊन टाकला. कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेज पाहणीसाठी टीम पाठवली. डी. वाय. पाटील यांचे मेडिकल कॉलेज 1989 साली सुरू झाले. डी. वाय. यांना माझ्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेजसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, मुंबईच्या मेडिकल कॉलेजची परवानगी शरद पवारांनी तशीच लोंबकळत ठेवली. मग डी. वाय. यांच्या आग्रहावरून मी पुन्हा एकदा शरद पवारांना जाऊन भेटलो. त्यानंतर कुठे सूत्रं हलली आणि त्यांनी मुंबईच्या जागेची पाहणी करण्यासाठी टीम पाठवली आणि रीतसर परवानगी दिली. त्यानंतर त्याचं वर्षी डी. वाय. पाटलांचं मुंबईतील मेडिकल कॉलेज सुरू झालं.

शरद पवार हे किती चाणाक्ष आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी दिलेला शब्द त्यांना पाळावयास लावणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. डी.वाय.ना तर शरद पवार दादच द्यायला तयार नव्हते. वास्तविक, शरद पवार, डी. वाय. पाटील यांच्या विनंतीमुळेच मी हाताशी आलेला ‘सकाळ’ सोडला.

अखेर मी माझा स्वतःचा करिष्मा वापरूनच पवारांकडून दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांची मंजुरी डी.वाय.ना मिळवून दिली. पुढे डी.वाय.नी एक औपचारिक बाब म्हणून मेडिकल कॉलेजचं गव्हर्निंग कौन्सिल स्थापन केलं आणि त्यावर जनरल थोरात, डॉ. वि. ह. वझे यांच्यासोबत माझंही नाव घातलं.

जरी मुख्यमंत्री या नात्यानं शरद पवारांनी डी.वाय.ना दोन मेडिकल कॉलेजची परवानगी दिली असली, तरी खासगी शिक्षण क्षेत्रात विनाअनुदान तत्त्वावर शिक्षणसंस्था महाराष्ट्रात सुरू होण्याचं खरं श्रेय वसंतदादा पाटील यांनाच जातं.

1983 मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांनीच राज्यात विनाअनुदान तत्त्वावर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत वसंतदादांचं औदार्य वाखाणण्यासारखंच होतं. त्यांचा एक किस्सा तर सांगण्यासारखाच आहे. डी. वाय. पाटील आणि वसंतदादा यांचे संबंध चांगले नव्हते. त्याचं कारण डी. वाय. हे राजारामबापू पाटलांचे कार्यकर्ते होते आणि राजारामबापू पाटील आणि वसंतदादा यांचे संबंध अगदी टोकाचे बिघडलेले होते. एकदा मी आणि डी. वाय. एकत्र असतानाच आमची वसंतदादांशी भेट झाली.
“डी. वाय., बरेच दिवस फिरकलाच नाहीत!” दादांनी सहजच विचारलं.
“तुम्ही आमची कामं थोडीच करणार?” डी. वाय. बोलून गेले.
“तू येऊन भेट तरी!” दादा हसून म्हणाले.

आणि मग त्यानंतर वसंतदादांनी कुठलाही आकस मनात न ठेवता, डी. वाय. पाटलांची अनेक कामं केली. याला म्हणतात मनाचा मोठेपणा!

मी शब्दाला जागणारा माणूस आहे. त्यामुळे मी नेहमी मदत करत असतो. शरद पवार यांना दिलेला शब्द मी पाळला व लीलाताई परुळेकरांना दिलेले डी. डी. परत घेतले. त्यामुळेच ‘सकाळ’ पवार कुटुंबीयांकडे गेला, तसेच डी.वाय.नादेखील मी मेडिकल कॉलेजीस मिळवून दिली. त्यावर त्यांनी शैक्षणिक संकुलाचा कोल्हापूरपासून ते मुंबईपर्यंत प्रचंड विस्तार केला. या माझ्या दोन्ही मित्रांना मी मदत केली, याचा मला आनंद आहे.

मैत्रीला जागणं हा माझा पिंडच असून, त्यामध्ये मी कधीही खोट येऊ देत नाही. माझे व शरद पवारांचे वैचारिक मतभेद जरूर होते, आहेत. पण मनभेद कधीच नव्हते. माझ्या प्रत्येक घरच्या, ‘पुढारी’च्या कार्यक्रमाला ते येतात, तर मीही त्यांना नेहमी भेटत असतो. कोल्हापूर, पुणे, मुंबई किंवा दिल्ली या ठिकाणी बर्‍याच वेळा आमच्यात चर्चाही होत असते. ‘पुढारी’ने पवारांच्या 75 व्या वाढदिवसाला काढलेली पुरवणी, सर्व वृत्तपत्रांत चांगली पुरवणी म्हणून कौतुक झाले.

यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांशी माझे जवळचे संबंध होते व आहेत. शरद पवारांची हुशारी, कार्यतत्परता, अभ्यास याबाबत मला त्यांचे नेहमी कौतुक वाटते. केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला लाभलेले एक कर्तृत्ववान, अभ्यासू, मुत्सद्दी असे ते नेते आहेत. कुशल संघटक, दांडगा जनसंपर्क, प्रवाही वक्तृत्व, समकालीन भान, लोकांच्या प्रश्नांंची सखोल जाण, विरोधकांना मित्र बनविण्याची हातोटी व मुत्सद्दी राजकारण हे त्यांच्या नेतृत्वाचे ठळक गुण आहेत.

वयाच्या 81 व्या वर्षीही धडाडीने काम करण्याची धमक त्यांच्यात असल्याचे दिसते. ‘कात्रजचा घाट दाखविणे’ हा शब्दप्रयोग त्यांच्याबाबतीत अनेकवेळा वापरला गेला आहे. या संदर्भात ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात ते म्हणतात, ‘प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचाचा थांगपत्ता लागू न देणे ही हातोटी राजकारणात असावी लागते. माझ्याकडे ती आहे आणि मी तिचा खुबीने वापर करतो.’ गडहिंग्लज नगरपालिकेच्या माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला ते प्रमख पाहुणे म्हणून आले, यातच आमच्या मैत्रीचे गमक आहे.

श्रीमती लीलाताई परुळेकर यांना मदत करावी, या प्रामाणिक हेतूनंच मी ‘सकाळ’ प्रकरणात भाग घेतला होता. त्यावेळी त्यातून माघार घेण्याचा शब्द मी शरद पवारांना दिला होता. तो मी प्रामाणिकपणे पाळला. माझी दानत काय होती, हे मी यानिमित्तानं दाखवून दिलं.

मुंबई न्यायालयात लीलाताई वेळेत रक्कम भरू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा दावा निकाली निघाला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे समजले. मात्र त्या याचिकेचा निर्णय काय झाला, याची काही माहिती मला समजली नाही.

Back to top button