सेक्स्टॉर्शन  आणि कायदे | पुढारी | पुढारी

सेक्स्टॉर्शन  आणि कायदे | पुढारी

अ‍ॅड. प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ

बदलत्या काळात गुन्हेगारीचे आणि शोषणाचेही स्वरूप बदलत चालले आहे. हे बदलते प्रकार अनेकांना अचंबित करणारे असले तरी ते घडत आहेत हे वास्तव आहे. यातीलच एक प्रकार म्हणजे ऑनलाईन लैंगिक छळ. याला सेक्स्टॉर्शन असे म्हटले जाते. अनेकदा याला बळी पडलेले लोक लोकलाजेस्तव गप्प बसतात. याची ना तक्रार करतात ना कुणाला काही सांगतात. साहजिकच अशा प्रकारे लोकांकडून खंडणी वसूल करणार्‍या टोळ्यांचे फावते आणि अधिक जोमाने ते आणखी गुन्हे करायला सज्ज होतात. म्हणूनच आपण याविषयी अधिक जाणून घेतले पाहिजे. 

ऑनलाईन लैंगिक छळ म्हणजे काय?

याला सेक्स्टॉर्शन असाही शब्द वापरला जातो. एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी, तशीच लैंगिक खंडणी म्हणजे लैंगिक छळ अशा अर्थाने सेक्स्टॉर्शन हा शब्द वापरला जातो. यात पैशाच्या रूपात खंडणी मिळवण्यासाठी किंवा लैंगिक सुख मिळवण्यासाठी व्यक्‍तीच्या लैंगिक प्रतिमा किंवा माहिती सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत लैंगिक छळ केला जातो. 

याची पद्धत : 

1. यात गुन्हेगार डेटरला प्रच्छन्न लैंगिक फोटो पाठवायला भाग पाडतो. एकदा का गुन्हेगारांना (स्कॅमर्स) फोटो मिळाले की ते स्वत:ला तपास/कायदा यंत्रणेचे अधिकारी म्हणवून घेत, डेटरला सांगतात की, त्याने फोटो अल्पवयीन मुलांना पाठवले आहेत. मग ते डेटरला सांगतात की, अटक टाळायची असेल तर पैसे द्या. अनेकदा हे स्कॅमर्स अधिकार्‍यांच्या नावाचा गैरवापरही करतात. म्हणजे सेवेतील अधिकार्‍यांची नावे स्वत:ची असल्याचे सांगत व्यक्‍तींना लुटायचा प्रयत्न करतात. 

2. मग या गुन्हेगारांच्या टोळ्या महिलांचे ऑनलाईन अकाउंट्स तयार करतात आणि आकर्षक महिलांचे फोटो क्‍लाएंट्सना आकर्षित करण्यासाठी पोस्ट करतात. मग अश्‍लील फोटो टाकून जाळ्यात अडकलेल्या व्यक्‍तींना त्या महिलांशी व्हिडीओ चॅट करायला लावतात. जे बहुतांश वेळा अश्‍लील असते. एकदा का त्यांना असे व्हिडीओ मिळाले की या टोळ्या हे व्हिडीओ चॅट्स त्यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देतात आणि पैशाची मागणी करतात. 

 याला आळा कसा घालायचा? : ज्या व्यक्‍ती याला बळी पडल्या आहेत त्यांनी आपले अनुभव न लाजता इतरांना सांगण्याची गरज आहे. सेक्स्टॉर्शन या संकल्पनेविषयी अधिक माहिती घेण्याची गरज आहे. लोकांना त्याबाबत जागरूक करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा याला बळी पडलेले लोक लोकलाजेस्तव गप्प बसतात. याची ना तक्रार करतात ना कुणाला काही सांगतात. साहजिकच अशा प्रकारे लोकांकडून खंडणी वसूल करणार्‍या टोळ्यांचे फावते आणि अधिक जोमाने ते आणखी गुन्हे करायला सज्ज होतात. म्हणूनच आपण याविषयी अधिक जाणून घेतले पाहिजे. आणि इतरांना त्याबाबत जागरूक केले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विषयाशी निगडित कायद्यांची माहितीही आपण घेतली पाहिजे. 

• कायदे : 1. माहिती तंत्रज्ञान कायदा,2000 चे कलम 66 ई खासगीपणाचे उल्लंघन-जी व्यक्‍ती हेतूपूर्वक किंवा जाणूनबुजून कोणत्याही व्यक्‍तीच्या, तिच्या किंवा त्याच्या परवानगीशिवाय, खासगी क्षेत्राची प्रतिमा काढून ती प्रकाशित किंवा संविहित करते, ती त्या व्यक्‍तीच्या खासगीपणाचे उल्लंघन करते. 

2) माहिती तंत्रज्ञान कायदा,2000 चे कलम 67

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्‍लील साहित्य प्रकाशित किंवा संविहित करण्याबद्दल शिक्षा.

3) माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 अ.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रच्छन्न लैंगिक कृती असलेले अश्‍लील साहित्य प्रकाशित किंवा संविहित करण्याबद्दल शिक्षा.  4) माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 ब.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लहान मुलांसंदर्भात अश्‍लील गोष्टी करण्याबद्दल शिक्षा, इंटरपोलचा तपास.

5) भारतीय दंड संहिता,1860च्या कलम 387 जे खंडणीविरोधात लागू केले जाते, तेही या गुन्ह्यात लागू आहे.  6) खंडणीखोर जर मुलीचा विनयभंग करत असेल तर आयपीसी 1860च्या कलम 506 चा दुसरा परिच्छेद लागू करण्यात येतो. 

 सेक्स्टॉर्शनचे भारतातील प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने01/02/2016 रोजी सेक्स्टॉर्शन आरोपी एम. सत्यानंदम् याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. हा सत्यानंदम् एपीएसपीडीसीएलचा निलंबित विभागीय अभियंता होता. म्हणजे विद्युत विभागात विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होता. महिलांचा लैंगिक छळ करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या टोळीत त्याचा सहभाग होता. 

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती. 11 डिसेंबर 2015 रोजी  आंध्र प्रदेशातील मचवरम येथे हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. सत्यनंदम् या प्रकरणातील चौथा आरोपी होता. एका महिलेने पोलिस आयुक्‍तांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा खटला भरवण्यात आला होता. 

इंटरपोलच्या समन्वयाने आतापर्यंत जगात अनेक सेक्स्टॉर्शनची नेटवर्क शोधून काढण्यात आली आहेत. यात 58 व्यक्‍तींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यातच स्कॉटिश किशोरवयीन मुलगी डॅनिएल पेरी हिच्या लैंगिक छळाशी संबंधित तीन लोकांचाही समावेश आहे. पेरी ही सतरा वर्षांची मुलगी होती. तिला ऑनलाईन ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्याला घाबरून तिने तीन वर्षांपूर्वी स्कॉटलंडमधील एडीन्बर्गजवळील फोर्थ रोड पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. 

या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी इंटरपोल डिजिटल क्राईम सेंटर, हाँगकाँग पोलिस फोर्स, सिंगापूर पोलिस फोर्स आणि फिलीपाईन्स नॅशनल पोलिस, अँटी सायबरक्राईम ग्रुप यांनी एकत्रित काम केले आणि त्यातून फिलीपाईन्समधील संघटित गुन्हेगार टोळ्यांसाठी काम करणार्‍या 190 ते 195 लोकांना अटक करण्यात आली होती. 

Back to top button