नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदी | पुढारी

नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदी

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. 3 मे नंतर ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजविण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे.

आज नाशिक मनसेचे विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे यांच्यासह नटू देवरे, राकेश परदेशी, हेमंत भडांगे, अंगद चौधरी, वर्धमान संचिती, मनोज घोडके यांनी 15 भोंग्याची ऑर्डर दिली आहे. पुढच्या एक दोन दिवसांत 150 ते 200 भोंगे खरेदी करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. त्याचबरोबर 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास सर्व मंदिरांमध्ये भोंग्याच्या आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान आज, नाशिकचे नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश रद्द केला आहे. 17 एप्रिलला दीपक पांडेय यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता. या आदेशानुसार 3 मे पर्यंत भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार होते. मात्र नवनियुक्त आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 17 एप्रिलचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. अशातच एकीकडे मनसेकडून भोंगे खरेदी केले जात आहेत. त्यामुळे यावर पोलिस काय भूमिका घेतात हेही पाहावे लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button