

पिंपरी : वर्षा कांबळे : पिंपरी चिंचवड शहरातील बेघर व बेवारस व व्यक्तींना रात्रीसाठी निवारा मिळावा, या उद्देशाने पिंपरीतील भाजी मंडईच्या इमारतीमध्ये रात्रनिवारा सुरू केला आहे.
याठिकाणी जवळपास शंभर बेघर व्यक्तींच्या राहण्याची सोय होईल एवढी जागा आहे. बेघर व्यक्तींना सुरक्षित निवारा मिळावा म्हणून सोयीसुविधा देेखील देण्यात आल्या आहेत. मात्र, निवारा केंद्रात फक्त बेघरांनाच निवारा दिला जातो, मग शहरातील भिक्षेकर्यांचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरातल्या चौकाचौकात सिग्नलवर, रेल्वे स्थानक, बस थांब्यावर, मंदिरांच्या बाहेर अनेक भिक्षेकरी भिक्षा मागताना दिसून येतात. मात्र, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे महापालिकेला विसर पडलेला आहे.
शहरातील बेवारस भिक्षेकरी यांचे काही देणेघेणे राहिलेले नाही. महापालिकेने कित्येक वर्षे भिक्षेकर्यांचे सर्वेक्षण देखील केलेले नाही. शासनाकडून महापालिकेने भिक्षेकर्यांची आकडेवारी प्राप्त होत होती. ती अनेक वर्षापासून बंद आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडे देखील सर्वेक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दीनदयाल अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय उपजिविका अभियानातंर्गत रात्र निवारा ही योजना केंद्र सरकारची असून महापालिकेतंर्गत चालविण्यात येत आहे.
पिंपरीतील भाजी मंडईच्या इमारतीमध्ये असलेल्या रात्रनिवार्यासाठी यापूर्वी लाखो रुपयांचा खर्च करुनही बंद अवस्थेच होता. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे दीनदयाल अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय उपजिविका अभियाना अंतर्गत 'रिअल लाईफ रिअल पिपल' या स्वयंसेवी संस्थेस निवारा केंद्र चालविण्यासाठी दिला आहे.
गेली अनेक वर्षे महिने ही संस्था निवारा केंद्र चालवित आहे. संस्थेने निवारा केंद्राचा कायापालट करुन 'सावली' निवारा केंद्र नाव दिले आहे.
एकेकाळी घाणीचे साम—ाज्य असणार्या निवारा केंद्राचे रुपांतर सुखसोयींनी युक्त अशा निवार्यात झाले आहे. याठिकाणी 163 लाभार्थ्यांनी निवारा केंद्राचा लाभ घेतला आहे. सध्या 51 बेघर याठिकाणी राहत आहेत. यामध्ये 32 पुरुष व 14 महिला आणि 5 मुले आहेत. निवार्यांची देखभाल करण्यासाठी नऊ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याठिकाणी पूर्ण मजल्यावर स्वच्छता आणि टापटीप ठेवण्यात आली आहे. महिला आणि पुरुष यांची राहण्याची वेगळी व्यवस्था, तसेच चहा, नाश्ता व जेवणाची सोय, अंघोळीसाठी गरम पाणी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या सुविधा असतानाही शहरात भिक्षेकर्यांचे पुलाखाली वास्तव्य दिसून येत आहे. याबाबत नागरवस्ती विभागाचे समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
निवारा केंद्र हे बेघर व बेवारस व्यक्तींसाठी उभारण्यात आले आहे. शासनाकडून शहरातील भिक्षेकर्यांचे सर्वेक्षण केले जात होते. आता बरीच वर्षे भिक्षेकर्यांचे सर्वेक्षण केलेले नाही.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, नागरवस्ती विकास योजना विभाग
भिक्षेकर्यांची संख्या आता कमी होत आहे. ते इतर ठिकाणाहून येतात. भिक मागणे हा काहींचा व्यवसाय झाला आहे. संस्था शहरातील बेघर आणि रस्त्यावर राहणार्या भिक्षेकरी यांचा शोध घेत असते. या व्यक्ती या निवारा केद्रात येण्यास तयार नसतात. आम्हाला त्यांचे समुपदेशन करावे लागते.
– एम.ए. हुसेन, संस्थापक,रिअल लाइफ रिअल पिपल