ग्रेटाने ११ महिन्यांनंतर घेतला ट्रम्प यांच्या ‘त्या’ ट्विटचा बदला | पुढारी

ग्रेटाने ११ महिन्यांनंतर घेतला ट्रम्प यांच्या 'त्या' ट्विटचा बदला

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरुन गेले दोन दिवस बराच गोंधळ सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच पिछाडीवर पडले असून त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन हे अध्यक्षपदासाठी लाणाऱ्या २७० या जादुई आकड्याच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करत मतमोजणी प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. अनेक जाणकारांच्या मते ही मागणी पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने केली आहे. दरम्यान, हवामान बदल विषयासंदर्भात काम करणाऱ्या १७ वर्षाची युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. तिने ११ महिन्यापूर्वी ट्रम्प यांनी ग्रेटाबद्दल केलेल्या ट्विटचा बदला घेतला. 

अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१९ ला ग्रेटा थनबर्ग ज्यावेळी टाईम मासिकाची ‘पर्सन ऑफ दी इयर’ ठरल्यानंतर ट्विट करुन तिची चेष्टा केली होती. आता पर्यावरणवादी चळवळीची युवा कार्यकर्ती ग्रेटाने ट्रम्प यांचे ते २०१९ चे शब्द त्यांना सव्याज परत केले. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी डिसेंबर २०१९ ला टाईम मासिकाचा ग्रेटाला पर्सन ऑफ दी इयर करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी ‘किती हास्यास्पद, ग्रेटा तू तुझ्या रागावर नियंत्रण मिळवण्यासठी काहीतरी करायला हवं. त्यासाठी तू तुझ्या मित्रांबरोबर जुन्या एखादा चित्रपट पहावास, चिल ग्रेटा चिल!’ असे टोमणे मारणारे ट्विट केले होते. 

आता हेच ट्विट ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांच्या मतमोजणी थांबवा या ट्विटला प्रतिक्रिया देताना केले. तिने ‘किती हास्यास्पद, डोनाल्ड तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासठी काहीतरी करायला हवं. त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर जुन्या एखादा चित्रपट पहावा, चिल डोनाल्ड चिल!’

ग्रेटाने गुरुवारी केलेल्या या ट्विटला डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या जुन्या ट्विटपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर दोनच दिवसांत हजारो लोकांनी तिच्या ट्विटला सपोर्ट केला आहे. 

विद्यमान अध्यक्ष डोनार्ड ट्रम्प यांनी कोणताही पुरावा न देताच ही निवडणूक बायडेन यांनी चोरली आहे असा दावा केला. त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर प्रखर टीका करत त्यांच्यावर ज्या ठिकाणी बायडेन यांनी आघाडी घेतली आहे तेथे घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 

Back to top button