अमेरिकेत कोरोनाचा कहर, दिवसात पावणे दोन लाख बाधित | पुढारी

अमेरिकेत कोरोनाचा कहर, दिवसात पावणे दोन लाख बाधित

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

जगावर महासत्ता म्हणून अधिराज्य गाजविणाऱ्या अमेरिकेत कोरोनामध्ये कहर सुरूच आहे. एका दिवसातच येथे तब्बल १ लाख ७७ हजार बाधित रूग्णांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. त्यातच, नवनिर्वाचीत अध्यक्ष जो बायडेनसुद्धा कोरोनाच्या या संकंट काळात सक्रिय झाले आहेत. त्यांनी शनिवारी आपल्या कोरोना टास्क फोर्सशी बैठक घेतली.

कोरोनाच्या आकडेवारीबद्दल एक नजर टाकली असता शुक्रवारपर्यंत जगातील जवळपास साडेपाच कोटी लोक बाधित झाले आहेत. त्याचबरोबर ३ कोटी ७८ लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे तर १३ लाख १७ हजार रुग्णांनी आपले प्राण सोडले आहेत. याव्यतिरिक्त, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचेही म्हटले जात आहे.

ओरेगॉन, मिशिगन मधील निर्बंध

अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे रूग्ण वाढण्याचा विक्रमी आकडा समोर आला आहे. येथे एका दिवसात १ लाख ७७ हजार बाधित झाले असून बाधितांच्या संख्येने १.०७ कोटीचा आकडा पार केला आहे. ओरेगॉन आणि मिशिगनमध्ये कोरोनाचे संक्रमण खूप वेगाने पसरत आहे. ज्यामुळे येथे काही निर्बंधही लादले गेले आहेत.

५० राज्यात कोरोनाचा संसर्ग

अमेरिकेतील सर्व ५० राज्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. परंतु येथे अशी दहा राज्ये आहेत जेथे इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक बाधित आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाने मृत झालेल्यांची संख्या २,४४,२१७ झाली आहे.

न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्नियाची वाईट स्थिती

अमेरिकेच्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया तिन्ही राज्यांचा कोरोना अधिक प्रमाणावर पसरला आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्येच कोरोनामुळे जवळपास ३४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच न्यूजर्सीत मृतांचा हा आकडा १६,५२२ आहे. तर कॅलिफोर्नियामध्ये १८,१७२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button