Harshal vs Riyan : खिलाडूवृत्तीला सुरुंग!, हर्षलने परागशी हात मिळवण्यास दिला नकार | पुढारी

Harshal vs Riyan : खिलाडूवृत्तीला सुरुंग!, हर्षलने परागशी हात मिळवण्यास दिला नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Harshal vs Riyan : आयपीएल 2022 मध्ये मंगळवारी 39 वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) यांच्यात खेळला गेला. राजस्थानने हा सामना 29 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा रियान पराग यांच्यात वादावादी झाली. याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. सामना संपल्यानंतर हर्षलने असे काही केले की, सर्वजण टीका करत आहेत.

वास्तविक, राजस्थान रॉयल्सच्या (RR) डावात परागने हर्षल पटेलच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले होते, त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना बचावासाठी यावे लागले. पण हा संघर्ष इथेच संपला नाही. (Harshal vs Riyan)

यानंतर आरसीबीच्या डावात रियान परागने कुलदीप सेनच्या चेंडूवर हर्षल पटेलचा झेल घेतला. हर्षल बाद होताच आरसीबीचा संघ 115 धावांमध्ये गुंडाळला. हर्षलने 11 चेंडूत 8 धावा केल्या. त्याचवेळी सामना संपल्यानंतर हर्षल आणि हेजलवूड ड्रेसिंग रूममध्ये परतायला लागले, तेव्हा राजस्थानच्या खेळाडूंनी दोघांशी हस्तांदोलन केले. यावेळी हर्षल पटेलने इतर सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले. पण परागने हात पुढे केल्यावर हर्षलने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेला. त्यानंतर परागने मागे वळून पाहिले, पण हर्षल पुढे निघून गेला. (Harshal vs Riyan)

क्रिकेटच्या मैदानावर, कोणत्याही खेळाडूने आपली खिलाडीवृत्ती विसरू नये. सामन्यादरम्यान काहीही झाले तरी सामना संपताच सर्वजण एकमेकांशी बोलताना दिसतात. आता हर्षलच्या या वागण्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका होत आहे. (Harshal vs Riyan)

 

Back to top button