Virat and IPL : 'रन मशीन' पुन्‍हा केव्‍हा 'धाव'णार? जाणून घ्‍या, विराट कोहलीचा मागील ६ 'आयपीएल' सीजनमधील प्रवास... | पुढारी

Virat and IPL : 'रन मशीन' पुन्‍हा केव्‍हा 'धाव'णार? जाणून घ्‍या, विराट कोहलीचा मागील ६ 'आयपीएल' सीजनमधील प्रवास...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

एक असा खेळाडू जो केवळ विजयासाठीच तो मैदानात उतरतो, अशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची ओळख आहे. त्‍यामुळेच मैदानातील त्‍याचा आत्‍मविश्‍वास हा नेहमीच त्‍याच्‍या फॅन्‍सला आश्‍वासक वाटतो. मागील एक दशकाहून अधिक काळ त्‍याने आपल्‍या उत्‍कृष्‍ट व अविस्‍मरणीय खेळींमधून क्रिकेटप्रेमींना भरभरुन दिलंय. त्‍यामुळे तर ‘रन मशीन’ हे बिरुद केवळ त्‍यालाच शोभून दिसते. मात्र मागील काही दिवस हे ‘रन मशीन’ थबकलं आहे. नेमकं काय बिघडलं, हे त्‍यालाही समजत नाही. मंगळवारीही राजस्‍थानविरुद्‍धच्‍या सामन्‍यात सलामीला येवूनही विराट पुन्‍हा एकदा अपयशी ठरला. यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये त्‍याचा कामगिरी सर्वात निराशाजनक झाली आहे. त्‍यामुळेच विराटचे ‘रन मशीन’ पुन्‍हा केव्‍हा धावणार, असा प्रश्‍न त्‍याचे चाहते करत आहेत. या निमित्त जाणून घेवूया, मागील ६ आयपीएल सीजनमधील ( Virat and IPL ) विराट कोहलीचा प्रवास..

Virat and IPL : आजही ‘हा’ विक्रम विराटच्‍या नावावर

आयपीएल २०१६ : या सीजनमध्‍ये विराटने चार शतक खेळी केल्‍या. आजही त्‍याच्‍या नावावरील हा विक्रम अबाधित आहे. या सीजनमधील त्‍याची सर्वोत्तम धावा ११३ होत्‍या. तो एकूण १६ सामने खेळला. त्‍यामध्‍ये ८१.०८ सरासरीने त्‍याने ९७३ धावा केल्‍या. चार खेळीत तो नाबाद राहिला होता. त्‍याने ३८ षटकार ठोकले. आरसीबी संघाने अंतिम सामन्‍यात धडक मारली होती. मात्र अंतिम सामन्‍यात हैदराबादच्‍या संघाने बाजी मारली.

विराटच्‍या अपयशामुळे संघ ‘प्‍ले ऑफ’पूर्वीच बाद

आयपीएल २०१७ : या सीजनमध्‍ये खांद्‍याला दुखापत झाल्‍याने विराट स्‍पर्धेतील पहिल्‍या चार सामन्‍यांना मुकला होता.
त्‍याने १० सामने खेळले. ३०.८० सरासरीने ३०८ धावा केल्‍या . केवळ चार अर्धशतकी खेळी त्‍याने केल्‍या. विराट अपयशी ठरल्‍याने आरसीबीचा संघ प्‍ले ऑफमध्‍ये पोहचू शकला नाही.

Virat and IPL : विराट पुन्‍हा फॉर्ममध्‍ये, १४ सामन्‍यांमध्‍ये ५३० धावा

 virat 3www.pudharinews

आयपीएल २०१८ : हा सीजन विराटसाठी दमदार गेला. १४ सामन्‍यांमध्‍ये त्‍याने ४८.१८ सरासरीने ५३० धावा केल्‍या. या सीजनमध्‍ये विराट तीनवेळा नाबाद राहिला होता. त्‍याची सर्वोच्‍च धावसंख्‍या ९२ होती. त्‍याने चार अर्धशतके झळकावली. विराटने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले तरीही आरसीबीचा संघ अंतिम सामन्‍यात पोहचण्‍यास अपयशी ठरला होता.

तीन वर्षानंतर ठोकले शतक

आयपीएल २०१९ : या सीजनमध्‍येही विराटने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्‍याने तीन वर्षांनंतर शतक ठोकले. या सीजनमधील त्‍याची सर्वोच्‍च धावसंख्‍या ही १०० होती. १४ सामन्‍यात ३३.१४ सरासरीने त्‍याने ४६४ धावा केल्‍या होत्‍या. दोन अर्धशतके फटकावली. विराटने धावा केल्‍या तरीही आरसीबीचा संघ प्‍लेऑफमध्‍ये पोहचू शकला नाही.

तीन अर्धशतके, चार सामन्‍यात नाबाद

आयपीएल २०२० : या सीझनमध्‍ये २०१८च्‍या खेळीची पुनरावृत्ती झाली. १५ सामन्‍यात विराटने ४६६ धावा केल्‍या. सर्वाधिक धावसंख्‍या ९० होती. त्‍याने ४२.३६ सरासरीने ४६६ धावा केल्‍या. तीन अर्धशतके फटकावत चार सामन्‍यात तो नाबाद राहिला होता. आरसीबी प्‍लेऑफमध्‍ये पोहचली मात्र एलिमिनेटर सामन्‍यात पराभव झाला.

Virat and IPL : तीन अर्धशतके, १५ सामन्‍यात ४०५ धावा

आयपीएल २०२१ : या सीझनमध्‍ये विराटने १५ सामन्‍यांमध्‍ये ४०५ धावा केल्‍या. सर्वोच्‍च धावसंख्‍या ७२ होती. सरासरी २८.९२ धावा केल्‍या. तीन अर्धशतके फटावली. या सीझनमध्‍येही एलिमिनेटर सामन्‍यात कोलकाताने आरसीबीचा पराभव केला.

आजवरची सर्वात निराशाजनक कामगिरी

virat 4 www.pudharinews

आयपीएल २०२२ : यंदाचा सीझनमधील विराटची कामगिरी खुपच निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत ९ सामन्‍यांमध्‍ये त्‍याने १६च्‍या सरासरीने केवळ १२८ धावा केल्‍या आहेत. ४८ धावा ही त्‍याची सर्वोत्तम खेळी आहे. आरसीबी अजून पाच सामने खेळणार आहे. या सामन्‍यांमध्‍ये तरी विराटने आपल्‍या नावाला साजेसा खेळ करावा, अशी अपेक्षा चाहते व्‍यक्‍त करत आहेत.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्‍ये विराट कोहलीने शतकी खेळी केली त्‍याला सुमारे अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.२३ नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये त्‍याने कोलकाताच्‍या इडन गार्डनवर बांगलादेशविरोधात शतक ठोकले होते. यानंतर तब्‍बल १०० हून अधिक सामने तो खेळला आहे. मात्र आपल्‍या नावाला साजेसी कामगिरी करण्‍यात त्‍याला अपयश आले आहे. टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वी पुन्‍हा एकदा फॉर्ममध्‍ये येण्‍यासाठी आयपीएलमधील आगामी पाच सामने विराटसाठी महत्त्‍वपूर्ण ठरणार आहेत. त्‍यामुळेच या सामन्‍यांकडे विराटच्‍या चाहत्‍यांसह सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

 

Back to top button