हिंगोली : टेम्पो दुचाकीची धडक तर एक तरूण जागीच ठार | पुढारी

हिंगोली : टेम्पो दुचाकीची धडक तर एक तरूण जागीच ठार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते शिरड शहापूर मार्गावर काठोडा पाटीजवळ टेम्पो-दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. शनिवारी (दि.23) दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. भुजंग सिताराम मोरे असे मृत व्यक्तिचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कळमनूरी तालुक्यातील बोल्डावाडी येथील भुजंग मोरे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी औंढा नागनाथ येथे आले होते. औंढा येथील काम आटोपून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिरड शहापूर मार्गे परत गावाकडे निघाले होते. यावेळी औंढा नागनाथ ते शिरड शहापूर मार्गावर काठोडा पाटीजवळ शिरड येथून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. या अपघातात भुजंग मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो जागेवरच सोडून पळ काढला आहे. अपघाताची माहिती मिळताच कुरूंदा पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करून मृतदेह तपासणीसाठी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  

Back to top button