धुळे : केशरानंद जिनिंगला भीषण आग, ५० लाखांची यंत्रसामुग्री, सरकी जळून खाक | पुढारी

धुळे : केशरानंद जिनिंगला भीषण आग, ५० लाखांची यंत्रसामुग्री, सरकी जळून खाक

धुळे : पुढारी वृत्तसेवा : दोंडाईचा येथील ब्राह्मणे या गावाजवळ असणाऱ्या केसरानंद उद्योग समूहाच्या केशरानंद जिनिंगला आज (दि. २३) भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये २५ लाख रुपये किमतीची यंत्रसामुग्री व सुमारे २५ लाखांची सरकी असा एकूण ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जिनिंगच्या एका भागातून आज अचानक धूर निघत असल्याची बाब निदर्शनास आली. काही वेळातच या भागांमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे कर्मचार्‍यांनी तातडीने ही माहिती कारखान्याच्या प्रशासनाला दिली. यानंतर दोंडाईचा येथील अग्निशमन दलाचे बंब तातडीने आग लागलेल्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने तोपर्यंत भीषण रूप धारण केले होते. त्यामुळे नजीकच्या तालुक्यामधील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर दुपारी उशिरा ही आग नियंत्रणात आली.

मात्र, तोपर्यंत कारखान्यात असलेली यंत्रसामग्री आणि गोदामात ठेवण्यात आलेल्या सरकीचा साठा जळून खाक झाला होता. या आगीमध्ये सुमारे पन्नास लाखाचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भामरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धुळ्यातील एमआयडीसीमधील एका कंपनीला भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. तर, शहरातील जवाहर सुतगिरणीला देखील मोठी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या पाठोपाठ आता केशरानंद जिनिंगला आग लागल्याची घटना घडली आहे.

हेही  वाचलंत का ? 

Back to top button