Mumbai : मुंबईत झवेरी बाजारात भिंतीत दडवलेले दहा कोटी रुपये जप्त | पुढारी

Mumbai : मुंबईत झवेरी बाजारात भिंतीत दडवलेले दहा कोटी रुपये जप्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीच्या कार्यालयावर राज्य जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 किलो चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या. या कंपनीची उलाढाल तीन वर्षात 23 कोटींवरुन थेट 1764 कोटींवर गेल्याचे लक्षात आल्यानंतर ही कंपनी राज्य जीएसटी विभागाच्या रडारवर आली आणि मग हा छापा टाकण्यात आला. (Mumbai)

कंपनीची उलाढाल 2019-20 मध्ये 22.83 कोटी होती ती 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत गेली. कंपनीची उलाढाल अकस्मात वाढल्यानंतर महाराष्ट्राच्या जीएसटी अधिकार्‍यांनी या कंपनीचा तपास सुरू केला. 16 एप्रिल रोजी चामुंडा बुलियनच्या विविध कार्यालयांची झडती घेतली असता कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी जीएसटीकडे करण्यातच आलेली नसल्याचे आढळून आले. (Mumbai)

ज्या कंपनी कार्यालयाची नोंद जीएसटीकडे नाही अशाच एका कार्यालयाच्या भिंतीत दडवलेली ही रोख रक्कम आणि चांदीच्या विटा सापडल्या हे विशेष. हे घबाड दडवण्यासाठी भिंतीत आणि स्लॅबमध्ये 35 चौरस फुटांची पोकळी निर्माण करण्यात आली होती. या जागेची मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे घबाड आमचे नव्हे म्हणून हात वर केले. या दडवलेल्या रक्कमेची आपल्याला काहीही माहिती नसल्याचे जागेच्या मालकाने सांगितले. ही जागा आता सील करण्यात आली आहे. (Mumbai)

 हेही वाचलंत का?

Back to top button