पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह बोकड ठार | पुढारी

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह बोकड ठार

पारगाव (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

रांजणी (ता. आंबेगाव) येथील पळस मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह एक बोकड ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी  घडली.  संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रांजणी ते मंचर रस्त्यावर पळसमळा आहे. तेथे शेतकरी शांताराम रामभाऊ वाघ राहतात. त्यांच्याकडे ११ शेळ्या आहेत. घराशेजारी चिकूची बाग आहे. या बागेमध्ये शुक्रवारी सकाळी सर्व शेळ्या बांधल्या होत्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शांताराम घरात जेवणासाठी गेले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला.तीन शेळ्या व एका बोकड जागीच ठार झाले. एका बोकडाला फरफटत ओढून नेत असताना बोकडाच्या ओरडण्याचा आवाज आला. शांताराम हे घराबाहेर पळत आले. त्‍यावेळी बिबट्याने बोकडाला सोडून चिकूच्या बागेपलिकडे धूम ठोकली.

शांताराम वाघ यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय वेलकर, वनरक्षक पी. के. पवार, महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

रांजणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील आठवड्यात रविवारी (दि. १७) या परिसरातील जुन्या वस्तीत ऊस तोड सुरू असताना दोन बिबट्याचे बछडे आढळून आले होते. आता बिबट्याकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले होऊ लागल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button