नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,५२७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १५,०७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.५६ टक्के एवढा आहे. दिवसभरात १,६५६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
याआधी गुरुवारी दिवसभरात २ हजार ४५१ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान १ हजार ५८९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५५ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ डोस देण्यात आले आहेत. तर २ कोटी ६१ लाख ७७ हजार २४८ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी ४० लाख ४५ हजार ६०५ डोस पैकी २० कोटी १० लाख ८२ हजार ८८५ डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
देशात कोरोना महारोगराईचा प्रकोप पुन्हा वाढत आहे. अशात ५ ते १२ वयोगटातील बालकांचे लसीकरण लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय औषध महानियंत्रकच्या (डीजीसीआय) विषय तज्ज्ञ समितीने मुलांसाठी बायोलॉजिकल-ई निर्मित 'कोर्बेव्हॅक्स' लस वापरण्याची शिफारस केली आहे. कंपनीकडून लसीसंबंधी देण्यात आलेल्या माहितीवर चर्चा केल्यानंतर समितीकडून ही शिफारस करण्यात आली आहे. संबंधित लस वापरण्याचा प्रस्ताव डीसीजीआयकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरीनंतर या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
'कोर्बेवॅक्स' लस आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे. चाचणीच्या सर्व टप्प्यांमध्ये या लसीचे समाधानकारक निष्कर्ष हाती आले आहे. सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून देखील कंपनीला आर्थिक मदत करण्यात आली आहे. देशात सध्या १२ वर्षांवरील मुलांना ही लस दिली जात आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती.
१२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले असून या वयोगटातील मुलांना २८ दिवसांच्या अंतराने 'कोर्बेव्हॅक्स'चे दोन डोस दिले जात आहेत. तर, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन ही लस दिली जात आहे.
हे ही वाचा :