‘मातोश्री’बाहेर मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली शिवसैनिकांची भेट | पुढारी

‘मातोश्री’बाहेर मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली शिवसैनिकांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शनिवारी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर केले आहे. तर आक्रमक झालेल्या शिवसेनेने मातोश्रीबाहेर सकाळपासून ठाण मांडले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ५ च्या सुमारास मातोश्री येथे येऊन शिवसैनिकांची भेट घेऊन सर्वांना अभिवादन केले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा देण्यात आल्या.

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यावर आम्ही ठाम असून, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रवी राणा म्हणाले की, हिंदुत्त्वावर मतं घेऊनच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण आज याच बाळासाहेबांनी शिकवलेल्या हिंदुत्वाचा त्यांना विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांचे आत्ताचे विचार हे बाळासाहेबांच्या विचारांना भगदाड पाडणारे आहेत. हनुमान चालिसा पठण करण्यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाचं पठण करावे, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. म्हणून आम्ही उद्या सकाळी ९ वाजता पोलिसांना सहकार्य करत, शांततेने मातोश्री समोर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे, रवी राणा यांनी सांगितले.

दरम्यान, राणा दाम्पत्य आज (शुक्रवार) मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी आज सकाळी मातोश्रीबाहेर ठाण मांडले होते. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी कलम १४९ ची नोटीस बजावली आहे. तर मातोश्रीबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Back to top button