मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्यांना बजावली कलम १४९ ची नोटीस | पुढारी

मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्यांना बजावली कलम १४९ ची नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आज (शुक्रवार) मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी कलम १४९ ची नोटीस बजावली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले असताना राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक एकवटले आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, बंटी आणि बबली येत असतील, तर येऊ देत. राणा दाम्पत्य स्टंटबाजी करत आहे. स्वत:ची मार्केटींग करण्यासाठी त्यांची ही स्टंटबाजी सुरू आहे. हिंदूत्वाला मार्केटिंगची गरज नाही. तर हनुमान चालिसा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. शिवसेनेविरोधात अशा सी ग्रेड लोकांचा वापर केला जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button