नाशिक : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान | पुढारी

नाशिक : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गिरणारे परिसरातील वाडगाव येथे गुरुवारी (दि.21) 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून विहिरीबाहेर काढण्यात आले. रेस्क्यू करण्यात आलेला बिबट्या चार वर्षांचा नर प्रजातीचा असल्याचे वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी सांगितले.

वाडगाव शिवारातील बाळासाहेब खोडे यांच्या मालकीच्या गट नंबर 336 मध्ये विहीर असून, तिला भरपूर पाणी आहे. सकाळी विहिरीतून बिबट्याने डरकाळी फोडल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल शांताराम हंबरे, वनरक्षक काळे यांच्यासह इको-इको फाउंडेशनचे अभिजित महाले व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 11च्या सुमारास पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद केले.

दरम्यान, भक्ष्यासह पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या बुधवारी रात्री विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. जेरबंद बिबट्याला गंगापूर येथील वनविभागाच्या नर्सरीत हलविण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर बिबट्या सुदृढ असल्यास त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी दिली.

स्थानिकांमध्ये समाधान
पंधरा दिवसांपूर्वी वाडगाव-गिरणारे परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता. या परिसरातून सलग दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, हल्ले करणारा व जेरबंद बिबट्या एकच आहे का? याबाबत वनविभागामध्ये संभ्रम कायम आहे.

हेही वाचा :

Back to top button