पुरुषांनाच का पडते टक्‍कल? जाणून घ्या कारण | पुढारी

पुरुषांनाच का पडते टक्‍कल? जाणून घ्या कारण

नवी दिल्‍ली : टक्‍कल पडणे ही बाब काही लोकांना आवडण्यासारखी नसते. मात्र, तरीही अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. स्त्रियांना ही समस्या फारशी भेडसावत नाही; पण पुरुषांना मात्र लवकर टक्‍कल पडत असते. हा फरक का होतो याचा कधी विचार केला आहे का? हे सर्व घडते पुरुषत्वासाठी जबाबदार असलेल्या एका विशिष्ट हार्मोनमुळेच!

वैज्ञानिकद‍ृष्ट्या केसांची वाढ किंवा गळणे या दोन्हीमागे हार्मोन्स महत्त्वाचे काम करतात. ‘टेस्टोस्टेरॉन’ हा पुरुषांमध्ये स्रवणारा एंड्रोजन ग्रुपचा एक स्टेरॉईड हार्मोन आहे. ज्यावेळी काही एन्झाईम्स टेस्टोस्टेरॉनला डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन (डीएचटी) मध्ये रूपांतरीत करतात त्यावेळी हे ‘डीएचटी’ टेस्टोस्टेरॉन केसांच्या मुळांवर हल्‍ला करतात. त्यामुळे केस वेगाने गळू लागतात आणि काही दिवसांतच टक्‍कल पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे विशिष्ट एन्झाईम्स अनुवंशिक असतात. त्यामुळे काही कुटुंबात पिढ्यान्पिढ्या टक्‍कल पडलेले पुरुष दिसतात. टक्‍कल पडण्याची समस्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. याचा अर्थ जर वडिलांना टक्‍कल पडण्याची समस्या असेल तर ती मुलामध्येही येऊ शकते.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्राव नगण्य असतो. स्त्रियांमध्येही टेस्टोस्टेरॉनचा स्राव होतो; पण त्याबरोबरच ‘इस्ट्रोजेन’ नावाच्या हार्मोनचाही स्राव होतो. त्यामुळे महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे ‘डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन’मध्ये रूपांतर होण्याची प्रक्रियाही कमी असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये टक्‍कल पडण्याची समस्या विशेष आढळत नाही. काही वेळा गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्तीदरम्यान डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन तयार करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अशा परिस्थितीत महिलांनाही केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. मात्र, काही काळानंतर पुन्हा केस येतात.

Back to top button