रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचा लांबणीवर पडलेला मार्च एण्ड शेवटच्या टप्प्यात असल्याने अर्थ व बांधकाम विभागात बिले काढण्यासाठी ठेकेदारांची मोठी धावपळ सुरू आहे. त्यातच, बिले मंजूर करण्यासाठी आता ठेकेदार स्वतः आपल्या फायली हातात घेऊन थेट अधिकार्यांच्या कक्षात जाताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कागदावर मार्च एण्ड संपला असल्याचे दाखवण्यात आले आहे. दुसर्या बाजूला एप्रिल महिना संपत आला तरीही अनेक विभागांचे पगार झालेले नाहीत. यातून वित्त विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना टक्केवारीची मोठी चर्चा सुरू होती. मात्र, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपला वचक निर्माण केला आहे. कामांच्या प्रलंबित फायली, प्रशासकीय, तांत्रिक मान्यता, टेंडर प्रक्रिया, कामांची बिले इत्यादी संदर्भात त्यांनी विभाग प्रमुखांना सक्त सूचना केलेल्या आहेत. त्याचे पालनही होत आहे. मात्र, काही विभागांत सीईओंच्या या सूचनांची पायमल्ली होताना दिसते.
सध्या झेडपीचा मार्च एण्ड सुरू आहे. त्यामुळे झालेल्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदारांची मोठी लगबग सुरू आहे. बांधकाम विभागात दररोज ठेकेदारांची गर्दी पाहायला मिळते. रत्नागिरी व चिपळूण बांधकाम विभागातही गर्दी कायम दिसून येते. कामे घेताना तत्कालीन पदाधिकार्यांचे ठरलेले 'टोल' फाडूनही बिले निघत नसल्याने ठेकेदारांमधून आता आदळआपट केली जात आहे. त्यातून, ठेकेदारांनी आता स्वतःच आपल्या फायली हातात घेतल्या आहेत. हे ठेकेदार आता फायली घेऊन अधिकार्यांच्या केबिनमध्ये जाताना दिसत आहे.
जिल्हा परिषदेत कामे घेणे आणि बिले काढण्यासाठी 'सिस्टिम' तयार झाली आहे. अनेक विभागांत ही यंत्रणा गोपनीयपणे काम करत असली तरी अर्थ व बांधकाम विभागात मात्र, कोणताही वचक राहिलेला दिसत नाही. जनतेसमोर सर्रासपणे ठेकेदारांकडून आकडेमोड केली जाते. त्यामुळे याप्रकरणी सीईओंनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात मार्च एण्डींग कागदावर संपवला असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी मागील दाराने हा मार्च एण्ड सुरू असून तो अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले जात आहे. या मार्च एण्डींगच्या गडबडीत कर्मचार्यांना मात्र उपाशी राहावे लागत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अनेक विभागातील कर्मचार्यांचे पगार झाले नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या ठेकेदारांच्या वाहनांची जि.प. च्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पार्किंगही हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे. यामुळे कामानिमित्त जि. प. भवनात आलेल्या सर्वसामान्यांना वाहने कुठे लावायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीवेळा मुख्य रस्त्यावरच वाहने पार्किंग करावी लागत आहेत.