तडफदार स्मिता तांबे ऊस मजुराच्या भूमिकेत दिसणार | पुढारी

तडफदार स्मिता तांबे ऊस मजुराच्या भूमिकेत दिसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तडफदार, कडक स्मिता तांबे ही अभिनेत्री आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक स्मिता तांबे होय. चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी ही गुणी अभिनेत्री आगामी ‘लगन’ या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे.

स्मिता तांबे

राधा या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेड्यात राहणारी ऊसतोडणी कामगाराची भूमिका स्मिताने यात साकारली आहे. करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. उसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे.

स्मिता तांबे

‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. मुळात प्रत्येक स्त्री मध्ये खूप माया दडलेली असते. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता सांगते.

‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे आहे. अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी. शंकरम यांनी गाण्यांना स्वरसाज दिला आहे.

प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पहायची शक्ती देतं. प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतं तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ चित्रपटात ६ मे ला पहायला मिळणार आहे.

Back to top button