पुणे : खेळताना कालव्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू | पुढारी

पुणे : खेळताना कालव्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा

सायकल खेळताना तोल सुटल्याने सायकल कालव्यात पडून बहीण-भावाचा बेबी कालव्यात बुडून दुर्देवी अंत झाल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमाने ग्रामस्थांनी दोन-तीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात या भावंडांचे मृतदेह शोधून काढले. जागृती दत्तात्रय ढवळे (वय ६) आणि शिवराज दत्तात्रय ढवळे (वय ३ ) रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ गांव देऊळगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असे मृत्यूमुखी पडलेल्या भावंडाची नावे आहेत.

खेळताना सायकल कालव्‍यात पडली

जागृती आणि शिवराय हे एका सायकलवर बसून कालव्यावरील भरावावर खेळत होते. जागृती ही सायकल चालवत असताना शिवराज हा पाठिमागे बसला होता. खेळता – खेळता जागृतीचा तोल सुटून सायकल कालव्यात पडून ही दोन्ही भावंडे कालव्यात वाहून गेली. मुले घरी आली नाही म्हणून चौकशी केली असता कालव्यात सायकल तसेच चपला आढळून आल्याने ही बालके कालव्यात पडल्याचे निदर्शनास आले.

ग्रामस्थांनी राबवली शोधमोहीम

ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.  स्थानिक युवक कालव्यात उतरून सुमारे दोन-तीन किलोमीटर कालव्याचे पात्र तपासून बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. या कालव्याला अतिदाबाने आवर्तन सोडल्याने पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्यामुळे बालकांचा शोध घेणे कठीण झाले. अखेर दोन-तीन किलोमीटर अंतरावर रात्री दहा व अकरा वाजण्याच्या सुमारास बालके जलपर्णीत अडकून आढळून आली. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 

Back to top button