नाशिक : मनपा प्रभागरचनेला नव्याने सुरुवात ; पण, आधीच्या प्रभागरचनेचे काय? | पुढारी

नाशिक : मनपा प्रभागरचनेला नव्याने सुरुवात ; पण, आधीच्या प्रभागरचनेचे काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने दिलेल्या आदेशांनुसार महापालिका निवडणुकांसाठी प्रभागरचना तयार करण्यास पुन्हा लवकरच सुरुवात होणार आहे. या संदर्भातील संचिका निवडणूक शाखेकडून महापालिका आयुक्त रमेश पवार यांना सादर करण्यात आली असून, प्रभागपद्धती बदलाबाबत नवे आदेश अद्याप नसल्याने त्रिसदस्यीय प्रभागपद्धतीनुसारच नवीन प्रभागरचना करण्यात येणार आहे.

यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच नवी प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, नवीन प्रभागरचना आखताना बदल काय करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मनपाची प्रभागरचना अंतिम टप्प्यात असतानाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य शासनाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मंजूर करत राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रारूप प्रभागरचना रद्द केली. प्रभागरचना तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य शासनाने स्वत:कडे घेतले. त्या संदर्भातील अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली. त्यानंतर नवीन प्रभागरचना तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. बुधवारी (दि.13) हे आदेश महापालिकेच्या निवडणूक शाखेला प्राप्त झाले. त्यानंतर त्या संदर्भातील संचिका तयार करून निवडणूक विभागाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांना सादर केली आहे. प्रभागरचना नव्याने तयार करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यावरील संचिकेसंदर्भात आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

आधीच्या प्रभागरचनेचे काय?
महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2021 व 27 जानेवारी 2022 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच त्रिसदस्यीय प्रारूप प्रभागरचना तयार केली आहे. आता शासनाने नव्याने प्रभागरचनेचे आदेश दिले असले तरी निवडणूक आयोगाच्या संबंधित मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश दिल्याने प्रशासनही संभ्रमात सापडले असून, यापूर्वीच्या प्रभागरचनेचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button